
शिष्यवृत्ती मार्गदर्शनाची आजगाव शाळेत सांगता
शिष्यवृत्ती मार्गदर्शनाची
आजगाव शाळेत सांगता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः आजगाव येथील गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पाचवीसाठीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा सांगता कार्यक्रम आजगाव मराठी शाळेत पार पडला. हा कार्यक्रम प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर व शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
मुख्याध्यापिका जाधव यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन वर्गात भाग घेतलेल्या चौदा विद्यार्थ्यांना गणेशप्रसाद गोगटे पुरस्कृत प्रमाणपत्रे देण्यात आली. सराव परीक्षेत यश संपादन केलेल्या गंधार गवंडे, मानसी पांचाळ, तनवी पांढरे, साहिल भागीत, प्रभाकर मोरजकर, आयान शेख आणि खुशी जाधव या सात मुलांना दीपक प्रभू पुरस्कृत अठराशे रुपयांची अठरा बक्षिसे आणि उत्कर्ष पांढरे, दिया सावंत, वैभव पांढरे, हर्षदा आरोलकर आणि विष्णू कळसुलकर यांना देण्यात येणारी श्याम धाकोरकर पुरस्कृत पाच बक्षिसे मुख्याध्यापिका जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.
प्रमोद नाईक पुरस्कृत पुस्तिकाही सर्व मुलांना भेट दिल्या. प्रतिष्ठानचे गिरीश बेहेरे, महेंद्र प्रभू उपस्थित होते. पालकांच्या वतीने अनिता पांचाळ, शहानूर शेख, रुची आरोलकर, गंधाली मोरजकर उपस्थित होत्या. शाळेतील मुलांसाठी इंग्लिश व्याकरण व सायन्सचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा मनोदय विनय सौदागर यांनी व्यक्त केला. मार्गदर्शन वर्गादरम्यान अल्पोपहार पुरस्कृत केलेल्या माधुरी काकतकर, संजय पंडित, श्याम तेंडोलकर, वंदना साळगावकर, हेमंत प्रभू आणि गौरी नातू यांचे ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार शिक्षक दत्तगुरू कांबळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक निंगोजी कोकितकर, रुपाली नाईक, स्वयंसेविका गौरी आरोलकर यांचे सहाय्य लाभले.