
रत्नागिरी ः नाट्य आस्वादाला खाद्याच्या कंटेनरचे गालबोट
- rat१९p१८.jpg ः KOP२३L८३७७६
रत्नागिरी ः दिवसभरातील कार्यक्रमादरम्यान नाट्यगृहातील आसनांवरच टाकलेले जेवणाचे रिकामे कंटेनर.
नाट्य आस्वादाला खाद्य कंटेनरचे गालबोट
सावरकर नाट्यगृह; दुपारी झालेल्या भोजनामुळे नाट्यरसिकांनाची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः शहरात गेला महिनाभर संगीत नाटकांचा जणू महोत्सव स्पर्धेनिमित्ताने अनुभवण्यास मिळाला. रत्नागिरीतील जाणत्या रसिकांचे कान आणि डोळेही या नाटकांमुळे सुखावले. रत्नागिरीतील सांस्कृतिक सभागृहात अखेरच्या दिवशी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वर्तनामुळे अस्वच्छतेचा आणि असंस्कृतपणाचा डाग लागला. स्पर्धेतील शेवटच्या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना आसनांवर अन्न खाऊन टाकलेले रिकामे कंटेनर पाहायला मिळाले. त्यामुळे सुरवातीलाच रसभंग झाला.
शुक्रवारी (ता. १७) नाट्यस्पर्धेची सांगता ''संगीत नात्याचे गणित'' या नाटकाने झाली; मात्र तत्पूर्वी दिवसभर नाट्यगृहात मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होता. तेथे उपस्थितांनी नाट्यगृहात सीटवर बसूनच जेवण घ्यावे, असे एका शासकीय अधिकाऱ्याने सांगितले. जेवण झाल्यावर आसनांवरच जेवणाचे कंटेनर टाकण्यात आले. त्यामुळे सर्वत्र अन्न पसरले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सफाईसाठी बोलावण्यात आले; मात्र पुरेशी स्वच्छता न करताच तेही निघून गेले, अशी तक्रार प्रेक्षकांनी केली. रात्री नाटक ८ वा. सुरू झाले. त्या वेळी अनेक आसनांवर जेवणाचे रिकामे कंटेनर असल्याने रसिकांची बसण्याची गैरसोय झाली होती; मात्र काही नाट्यरसिकांनी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी कंटेनर उचलले. रत्नागिरीकर रसिकांच्या संयमी व सुसंस्कृत प्रतिसादाने पार पडलेल्या नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागरिक म्हणून बेजबाबदार वागणुकीचे दर्शन अशातऱ्हेने झाल्यामुळे नाट्यगृहात नाटक सुरू होण्याआधी हा चर्चेचा विषय झाला होता.
प्रेक्षकांकडून नाराजी
नागरी सुविधा आवश्यक असताना त्याचा वापर करताना नागरिक म्हणून किती बेफिकीरीने वागले जाते याचा पडताळा, या निमित्ताने मिळाला. रिकामे कंटेनर ठेवण्याची व्यवस्था कोठे याची माहिती घेऊन ते ठेवले असते. तर त्यानंतर येणाऱ्या नाट्यरसिकांची गैरसोय टळली असती. शिवाय अस्वच्छताही झाली नसती; परंतु हे भान न राखले गेल्याबद्दल रत्नागिरी नाट्यरसिकांनी खेद व्यक्त केला.