राजापूर ः 24 तालुक्यातील जनतेचे होळीच्या दिवशी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः 24 तालुक्यातील जनतेचे होळीच्या दिवशी आंदोलन
राजापूर ः 24 तालुक्यातील जनतेचे होळीच्या दिवशी आंदोलन

राजापूर ः 24 तालुक्यातील जनतेचे होळीच्या दिवशी आंदोलन

sakal_logo
By

होळीच्या दिवशी २४ तालुक्यातील जनतेचे आंदोलन
रस्त्यावर उतरणार; रिफायनरीविरोधी संघर्ष समिती आक्रमक
राजापूर, ता. १९ ः ‘कुणबी जोडो’ अभियानानंतर झालेल्या बैठकीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २४ तालुक्यातील जनता शिमगोत्सवात/होळीच्या दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी दिली.
बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधी आंदोलकांवर प्रशासनाने तडीपारी करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. रिफायनरी विरोधी संघटनेच्या सत्यजित चव्हाण, अमोल बोळे, दीपक जोशी, नितीन जठार, सतीश बाणे यांच्या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी, लांजा यांनी तडीपार करण्याचा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांच्या कोर्टात सादर केला आहे. त्यावर अंतिम सुनावणी लवकरच होणार आहे.
या पार्श्‍वभूमीवर कोकण रिफायनरीविरोधी संघटनेचे नेते तथा कुणबी समाजोन्नती संघ, राजकीय संघटन अध्यक्ष अशोक वालम यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन रिफायनरी आंदोलकांवर तडीपारीचा निर्णय झालाच तर त्या विरोधात कोकणात मोठं आंदोलन करून त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर अशोक वालम यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की,‘नाणार असो की बारसू-सोलगाव येथील जनता रिफायनरी विरोधात आहे. जनतेवर कोणीही प्रकल्प लादणार नाही. याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. राजकीय दबावाला बळी पडून जनतेवर अन्याय झाला तर त्याचे दूरगामी परिणाम दिसून येथील, असा इशारा आम्ही दिला आहे.

रस्त्यावर आंदोलन
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ आणि रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात कुणबी जोडो अभियान राबवण्यात आले. या अभियानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर झालेल्या कुणबी समाजोन्नती संघाच्या बैठकीत कोकणात रिफायनरी उभारण्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकणात मोठ्या प्रमाणात शिमगोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला गावी चाकरमानी येतात. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोक या वेळी रस्त्यावर उतरून रिफायनरी विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.