
महान भारताच्या निर्माणासाठी संपूर्ण विजय आवश्यक ः अमित शहा
महान भारतासाठी सर्व ४८ जागा जिंकू
अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; लोकसभा, विधानसभा एकत्र लढण्याचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत देशाला प्रगतीपथावर नेले आहे. जगात भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. आपल्याला आता महान भारताची रचना करावयची आहे. त्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सर्व ४८ जागांवर विजय मिळवेल, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे कार्यकर्त्यांना केले. त्याचवेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेत दिले. नागाळा पार्क येथे भाजप कार्यालयाशेजारी झालेल्या कार्यकर्त्त्यांच्या विजय संकल्प रॅलीमध्ये ते बोलत होते.
श्री. शहा म्हणाले, ‘‘२०१४ पूर्वी देशाची जगातील प्रतिमा समाधानकारक नव्हती. पाकिस्तानी अतिरेकी जवानांची हत्या करत होते. १२ लाख कोटींचे घोटाळे उघड होत होते. पंतप्रधान सोडून सगळे मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते. राज्यकर्ते गप्प होते. जनता हतबल होती; मात्र २०१४ नंतर पंतप्रधान मोदींनी देशाची ११ व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले. काश्मीरचे ३७० कमल रद्द केले. अयोध्येत भव्य राम मंदिर साकारत आहे. आता आपल्याला महान भारताची रचना करायची आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून संपूर्ण विजय आवश्यक आहे.’’
सभेचे प्रास्ताविक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे, मंत्री सुरेश खाडे, खासदार धनंजय महाडिक, संजय पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित होते.
हव्यासापोटी उद्धव यांनी सत्ता तोडली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांची युती तोडली. त्यांचे म्हणणे आहे की आमच्या सोबत ते २५ वर्षे सडले; पण काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने अडीच वर्षांत ते संपले. काळाचा महिमा असा असतो. शिवसेना हा विचार आहे. एकनाथ शिंदे हा विचार जगले. त्यामुळे चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे आहे. मालमत्ता वारसा हक्काने मिळते; पण विचार जागवावा लागतो. आमच्याशी ज्यांनी बेईमानी केली त्यांना आम्ही सहा महिन्यांपूर्वी त्यांची जागा दाखवली. त्यांना असे चितपट केली की पुन्हा उठणार नाहीत. आता राज्यात शिवसेना आणि भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. वेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण राज्याला विकासाच्या मार्गावर गतिमान केले आहे.’’