
भाजी घ्या भाजी, वडापाव, पुरणपोळीही...
swt2018.jpg
84070
मालवणः भंडारी हायस्कूलमध्ये मुलांच्या आठवडा बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजी घ्या भाजी, वडापाव, पुरणपोळीही...
विद्यार्थी उतरले बाजारातः कृतीतून आर्थिक व्यवहाराचे धडे
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : भाजी घ्या भाजी... लाडू घ्या... वडापाव घ्या... पुरणपोळी घ्या... अशा आरोळ्या देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या मैदानावर भरलेल्या आठवडा बाजारात आपल्याकडील मालाची विक्री केली. मौजमस्ती आणि गंमतजंमत करीत विविध वस्तूंची विक्री करताना नकळतच विद्यार्थ्यांनी विक्री कौशल्य आणि आर्थिक व्यवहाराचे धडेही गिरवले. भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे पालकांसह सर्वांनी कौतुक केले.
येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या वतीने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजार हा उपक्रम राबविला जात आहे. दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार कौशल्य, हिशोब, पैशांची हाताळणी, देवाणघेवाण व विक्री कौशल्य आदी गोष्टींचे विद्यार्थ्यांना बालवयातच ज्ञान मिळावे, या दृष्टीने हा उपक्रम राबविला जातो. यावर्षीही प्रशालेच्या मैदानावर या आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांच्या मदतीने विविध वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, अंडी, पुरणपोळी, वडापाव, विविध प्रकारचे लाडू, शेंगदाणे, कुरकुरे आदी खाद्य पदार्थ तसेच विविध शीतपेये, पाण्याच्या बाटल्या आदी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीला ठेवल्या होत्या. यामध्ये त्यांना पालक व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा प्रारंभ भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. विद्यार्थ्यांच्या या आठवडा बाजारास भंडारी हायस्कूलमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शहरातील नागरिकांनी भेट देऊन वस्तूंची खरेदी केली. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कांबळी, हायस्कूलचे शिक्षक आर. डी. बनसोडे, श्रीमती मेस्त्री, ए. ए. वाईरकर, सुनंदा वराडकर, प्राथमिक शाळेचे शिक्षक भूपेश गोसावी, राधा दिघे, महेश लोकेगावकर, पूर्वी गोसावी आदी उपस्थित होते.