पान एक-चंदन चोरीने वेंगुर्लेत खळबळ

पान एक-चंदन चोरीने वेंगुर्लेत खळबळ

पान एक

८४१३६
८४१३७
८४१३८


चंदनाची झाडे होतात रातोरात गायब
---
वेंगुर्ले तालुक्यात प्रकार; पोलिस, वन विभागाचा माहिती देऊनही कानाडोळा
दीपेश परब ः सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २० ः तालुक्यातील रेडीपासून वेंगुर्ले शहरापर्यंत डोंगरी भागात असलेल्या चंदनाच्या झाडांची अज्ञातांनी तोड केल्याचे प्रकार पुढे आले आहेत. याबाबत पोलिस व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील चंदनाची झाडे धोक्यात आली आहेत. ही झाडे काही परप्रांतीय तोडत असल्याचा संशय येथील बागायतदारांनी व्यक्त केला आहे. वेंगुर्ले येथील नितीन कुबल यांच्या बागेतील झाडे तोडत असताना राखणदारांच्या निदर्शनास ही बाब आली. या प्रकरणाकडे पोलिस आणि वन विभागाने गांभीर्याने न पाहिल्यास लाखो रुपयांचा आणि कित्येक वर्षे जपलेला हा ठेवा चोरीला जाण्याची भीती आहे.
वेंगुर्ले तालुक्यात आंबा-काजूच्या बागा, तसेच डोंगराळ भागात चंदनाची झाडे आहेत. जिल्ह्यात याचे सर्वांत जास्त प्रमाण याच तालुक्यात आहे्. स्थानिकांनी ती अनेक वर्षे जपली. गेल्या १५ दिवसांत मात्र अचानक या झाडांची अज्ञातांकडून चोरटी तोड होत असल्याचे प्रकार उघड झाले. यामुळे शेतकरी बागायतदार यांच्यात भीतीचे वातवरण आहे. रेडीपासून वेंगुर्ले शहरापर्यंत डोंगराळ भागात अनेक चंदनाची झाडे आहेत. अज्ञात चोरटे याची प्रथम टेहळणी करून या झाडांची दुपारी किंवा रात्रीच्या वेळेस चोरी करतात. खरवत किंवा मशिनच्या सहाय्याने चंदनाची झाडे तोडून त्याच ठिकाणी त्याचे तुकडे करून तसेच काही भागात कोयत्याने छोटे-छोटे तुकडे करून ते घेऊन जातात. त्यांच्याकडे असणाऱ्या झाडे कापण्याच्या छोट्या मशिनरीचा फार मोठा आवाज येत नसल्याने झाड कापले, हे शेतकऱ्यांना वेळीच कळू शकत नाही. मात्र, जेव्हा शेतकरी अथवा बागायतदार आपल्या बागेत फेरफटका मारतात, तेव्हा हे प्रकार निदर्शनास येत आहेत. तालुक्यातील रेडी-गावतळेवाडी येथील गजानन राणे, दशरथ राणे, तळेवाडी येथील संदीप आरेकर, सुकळभाट येथील नितीन सावंत यांची चंदनाची झाडे तसेच येथील यशवंतगड समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात असलेली चंदनाची झाडे अशी मिळून एकूण १६ झाडे तोडली आहेत. तुळसघाटी, अणसूर-पाल डोंगर भागातील आणि उभादांडा-नमसवाडी आंबा व काजू बागातील झाडांचीही तोड झाली आहे. याबाबत रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी वन विभागाशी संपर्क केला. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
वेंगुर्ले शहरातील आंबा बागायतदार नितीन कुबल यांच्या तुळस घाटी डोंगरावरील आंबा व काजू बागेतील लहान व मोठी अशी १२ चंदनाची झाडे चोरट्यांनी मशिनने कापून नेली. दोन झाडे कापताना आवाज आल्याने तेथे राखण करणारे धावत गेल्याने चोरट्यांनी झाडे टाकून पळ काढला.

संशयास्पद हालचाली
तालुक्यात १५ दिवसांपासून हिंदी भाषा बोलणारे परराज्‍यांतील काही तरुण दुपारी व रात्रीच्या वेळी डोंगराळ भागातील आंबा व काजू बागेत जमाव करून फिरताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी अशा व्यक्तींना हटकत चौकशी केली असता त्यांनी आपण शिकारीसाठी फिरत असल्याचे सांगितले. मात्र ते कोणाकडे व कसले काम करण्यासाठी आले, याची माहिती देत नाहीत. ज्या शेतकऱ्यांना ते आढळले होते, त्यांच्या बागायतीतील चंदनाची झाडे मुळासह कापून नेल्याचे दुसऱ्या दिवशी आढळले.

कोट
पोलिसांनी अनोळखी व्यक्ती व त्यांच्या समूहाची तपासणी करावी. सध्या सिंधुदुर्गात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. हे चोरटे परराज्यांतील असू शकतात. त्यामुळे परराज्यांतील व्यक्ती कोणाकडे कामास आहेत किंवा ते कशासाठी आले आहेत, कुठे राहतात, त्यांची ओळखपत्रे याची माहिती पोलिसांनी घेण्याची गरज आहे; अन्यथा यापुढे आंबा व काजू चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
- नितीन कुबल, आंबा बागायतदार, वेंगुर्ले

वन खात्याने ज्या शेतकरी व बागायदारांच्या चंदन वृक्षांची चोरी झालेली आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊन चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत. सिंधुदुर्गात कोणत्याही शेतकऱ्याने चंदनाच्या झाडाची लागवड केल्याची नोंद शासन दप्तरी नाही. त्यामुळे वन खात्याने व पोलिस यंत्रणेने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- रामसिंग राणे, सरपंच, रेडी

वेंगुर्ले तालुक्यात रेडी, अणसूर, उभादांडा किनारी भागात चंदनाच्या झाडांची तोड झाली आहे. त्यानुसार वन विभागाने उभादांडा येथे पाहणी केली असून, तोडलेली झाडे जप्त केली आहेत. चंदनाच्या झाडांची तोड परराज्यांतील व्यक्ती करीत असल्याचा अंदाज असून, याची पोलिस व वन विभाग मिळून चौकशी करीत असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल.
- सावळा कांबळे, वनपाल, मठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com