
रत्नागिरी-क्राईम
मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ः माझ्याबद्दल अफवा का पसरवतोस, अशी विचारणा केली म्हणून दोन तरुणांना मारहाण करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्मान रमजानमियाँ मस्तान, आदनान रमजानमियाँ मस्तान, हमिता रमजानमियाँ मस्तान (तिन्ही रा. नवा फणसोप, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. १९) साडेतीनच्या सुमारास फणसोप रेशन दुकानासमोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल अब्दुलसत्तार होडकर (वय २२, सध्या रा. नेरूळगाव वेस्ट सेक्टर नवी मुंबई, मुळ ः नवा फणसोप, रत्नागिरी) यांनी संशयितांना अफवा का पसरवता? असे विचारले. संशयितांनी अफवा पसरवली असे सांगून तुला काय करायचे ते करून घे, असे बोलून साहिल होडेकर व त्यांचा भाऊ सुहेल होडेकर यांना मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साहिल होडेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला
रत्नागिरी ः गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृतदेह हातखंबा-डांगेवाडी येथील जंगलमय भागात कुजलेल्या स्थितीत सापडला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्ताराम सखाराम मालप (वय ७०, रा. निवळी, मालपवाडी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी दत्ताराम मालप गुरे चरवण्यासाठी हातखंबा येथील जंगलमय भागात गेले होते. त्यांची मुलगा व नातेवाइकांनी इतरत्र चौकशी करून शोध घेऊनही ते सापडले नव्हते. या प्रकरणी ५ फेब्रुवारीला ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मुलगा व नातेवाइकांनी वृद्ध दत्ताराम मालप ज्या परिसरात गुरे चरवण्यासाठी जात असत तो भाग पिंजून काढला त्या वेळी हातखंबा जंगलमय भागात गवतावर उजव्या कुशीवर त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.
आंबाघाटात एसटी टेम्पोची धडक
साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील आंबाघाटातील दख्खनजवळ एसटी बस व टेम्पो ट्रॅव्हल यांच्यात अपघात होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. याबाबत पोलिस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद अंबादास माळी (वय ३८, रा. जत) जत रत्नागिरी एसटी बस (एमएच-१४-बीटी-३१९९) हे रत्नागिरीकडे जात होते. आंबा घाटातील दख्खनजवळ एसटी आली असता समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलला (एमएच-२०- इके-५०८७) धडक बसली. हा टेम्पो अश्विनकुमार बाबुराव बनसोडे (वय २८, रा. लातूर) घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. या अपघातात दोन्ही गाड्यांचे सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले.