
कळसूली, शिवडावमध्ये ग्रामस्थांचा रास्ता रोको
kan२०४.jpg
८४१७६
कळसुली : येथे शिवडाव आणि कळसुली ग्रामस्थांनी रास्ता रोको करून डंपर वाहतूक रोखली.
कळसूली, शिवडावमध्ये
ग्रामस्थांचा रास्ता रोको
बेकायदा उत्खनन होत असल्याचा आरोप
कणकवली, ता. २० : तालुक्यातील कळसुली आणि शिवडाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज कळसुली मार्गावर डंपरच्या माध्यमातून होणारी खडी वाहतूक रोखली. प्रशासनाने बेकायदा सुरू असलेले काळ्या दगडांचे उत्खनन थांबवावे. विनापरवाना डंपर वाहतुकीवर कारवाई करावी आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या. याबाबतचे निवेदनही कणकवली प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यात बेकायदा दगड उत्खनन आणि वाहतूक न थांबल्यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.
तालुक्यातील कळसुली आणि शिवडाव गावात ११ क्रशर आहेत. या क्रशरवरून डंपरच्या माध्यमातून खडी वाहतूक होते. हे डंपर भरधाव वेगाने हाकले जात असल्याने वारंवार अपघात होतात. तसेच काळ्या दगडासाठी डोंगरामध्ये सुरूंग स्फोट केले जात आहेत. त्यामुळे कळसुली आणि शिवडाव गावातील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. क्रशरमधून येणाऱ्या धुळीमुळे शेती बागायती धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या कळसुली आणि शिवडाव ग्रामस्थांनी आज कळसुली मार्गावर एकत्र येऊन डंपर वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात कळसुली सरपंच सचिन पारधिये यांच्यासह जयवंत घाडीगावकर, अच्युत घाडीगावकर, दगडू गावकर, निलेश गावकर, परेश घाडीगावकर, परेश गावकर,जयवंत घाडीगावकर, तुकाराम घाडीगावकर, किशोर घाडीगावकर, महेंद्र घाडीगावकर, सुभाष घाडीगावकर, रमेश मेस्त्री, बळीराम पेंडूरकर, स्वप्नील नेरकर, घाकु घाडीगावकर, संजय नेरकर आदींसह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.