रत्नागिरी- ग्रामदैवत श्री भैरीच्या शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ग्रामदैवत श्री भैरीच्या शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर
रत्नागिरी- ग्रामदैवत श्री भैरीच्या शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर

रत्नागिरी- ग्रामदैवत श्री भैरीच्या शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२१p४.jpg- KOP२३L८४२२८ ग्रामदैवत श्री देव भैरी
----------
ग्रामदैवत श्री भैरीच्या शिमगोत्सवाची उत्सुकता

रूपरेषा जाहीर ; ६ मार्चपासून उत्सवाला सुरवात
रत्नागिरी, ता. २१ ः श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवासंदर्भाने भैरी मंदिरात बैठक झाली. या प्रसंगी १२ वाड्यांतील गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरवमंडळी उपस्थित होती. यामध्ये उत्सवाचे नियोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे हा उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
यंदा होळीचे झाड शिवाजी हायस्कूलशेजारी सावंत यांच्या कंपाऊंडमध्ये आहे. शिमगोत्सव पूर्वापार परंपरेनुसार शांततेत पार पडणार आहे. ६ मार्चला शिमगोत्सवाला सुरवात होईल व १२ मार्चला सांगता होईल.
६ मार्चला रात्री १० वा. सहाणेवरून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपरिक पद्धतीत झाडगांव सहाणेवरून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री ११ वा. पोहोचतील. मध्यरात्री १२ वा. श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेट, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिराबाहेर पडेल. ७ मार्चला श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरून पुढे नेमून दिलेल्या ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे. नंतर गाडीतळावरून शेरेनाक्यावरून शिवाजी हायस्कूलशेजारी नरेंद्र सांवत यांच्या कंपाउंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन तेथे होळी उभी केली जाईल.
७ मार्चला रात्री ९ वा. धुळवडीसाठी श्रीदेव भैरीचे निशाण सहाणेवरून निघेल. ढमालणीच्या पारावरून या निशाणाचे तीन भाग होतील. ते रितीरिवाजाप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी नेण्यात येतील. एक निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात जाईल. तेथे श्रीदेव विश्वेश्वराच्या हद्दीत फिरून श्रीदेव विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गाऱ्हाणे होईल. तेथून राजिवड्यातील चव्हाण यांच्या घराशेजारी जाईल. तेथे मुस्लिम मानकरी काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देऊन गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. ८ला मुरुगवाडा हद्दीजवळ जाऊन तेथे गाऱ्हाणे होऊन धुळवड परत मागे फिरून झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर दिवटीवाले यांच्या कंपाउंडमध्ये दुपारी १२ वा. येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल. ११ मार्चला दुपारी श्रीदेव भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी जाणार आहे.

चौकट
८ ते ११ मार्चला दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीदेव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल. ८ ते ११ मार्चदरम्यान दररोज रात्री १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. १२ मार्चला उत्सवाची सांगता रंगपंचमीने होणार आहे. दुपारी १ वा. श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून निघेल. तिथे पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेऊन भैरीची पालखी रवाना होईल. झाडगावनाका गाडीतळ, श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिर, शहर पोलिस ठाणे, धनजी नाक्यावरून राधाकृष्ण नाका, रामनाका, राममंदिर, मारूती आळी वगैरे करून रात्री ११.३० वा. भैरी मंदिरात पोहोचेल. रात्री १२ वा. पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल. धुपारत व गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होईल.