राजापूर-सौंदळ व्हॉल्ट स्टेशन सोयीचे, पण सोयीसुविधांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-सौंदळ व्हॉल्ट स्टेशन सोयीचे, पण सोयीसुविधांची गरज
राजापूर-सौंदळ व्हॉल्ट स्टेशन सोयीचे, पण सोयीसुविधांची गरज

राजापूर-सौंदळ व्हॉल्ट स्टेशन सोयीचे, पण सोयीसुविधांची गरज

sakal_logo
By

ग्राऊंड रिपोर्ट---लोगो

फोटो ओळी
-rat२१p१८.jpg ः KOP२३L८४२९४ सौंदळ व्हॉल्टस्टेशन
-rat२१p१९.jpg ः KOP२३L८४२९५ सौंदळ येथून जाणारी कोकण रेल्वे (छाया ः चारूदत्त नाखरे, राजापूर)
-rat२१p२०.jpg ःKOP२३L८४२८२ सौंदळ येथे व्हॉल्टस्टेशन येथे थांबलेली कोकणरेल्वे.
-------------
सौंदळ व्हॉल्ट स्टेशन सोयीचे,
पण सोयीसुविधांची गरज
प्लॅटफॉर्मची गरज ; एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळाल्यास प्रवाशांना दिलासा

इंट्रो

राजापूर, ता. २१ ः कोकणला कोकण रेल्वेच्या माध्यमातून मुंबईसह राज्य अन् परराज्यांमधील विविध शहरांना जोडण्यात आले आहे. माजी खासदार (कै.) मधू दंडवते आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नातून सुमारे तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या कोकण रेल्वेला राजापूर तालुक्यातील सोल्ये येथे राजापूर रोड म्हणून स्टेशन उभारण्यात आले आहे. त्यानंतर प्रा. चंद्रकांत देशपांडे आणि सहकार्‍यांनी सातत्याने केलेले प्रयत्न आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या पाठपुराव्यातून कोकण रेल्वेच्या तालुक्यातील सौंदळ येथे रेल्वे व्हॉल्ट (थांबा) निर्मिती करण्यात आली. या दोन्ही स्टेशनमुळे तालुक्यातील प्रवाशांना रेल्वेप्रवास करणे अधिक सोयीचे झाले असले तरी प्रवाशांना सोयीसुविधांची अपेक्षा आहे. त्यांची पूर्ती झाल्यास राजापूरकरांची कोकण रेल्वेची सफर (प्रवास) अधिक स्वस्त आणि मस्त होणार आहे. गरजेचे आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर
------------

सौंदळ व्हॉल्टस्टेशनला प्लॅटफॉर्म उभारणीची आवश्यकता

सौंदळ येथील व्हॉल्टस्टेशन तालुक्याच्या पूर्वभागातील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असून, या ठिकाणी प्रवाशांकडून कोकण रेल्वेने प्रवास करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणाहून हंगामामध्ये सुमारे शंभर तर अन्य काळामध्ये सुमारे ५० ते ६० प्रवाशी प्रवास करतात. मात्र, सौंदळ व्हॉल्टस्टेशनच्या येथे प्लॅटफॉर्म नसल्याने वयोवृद्ध वा वयाने लहान प्रवाशी, जास्त साहित्य घेऊन येणार्‍या प्रवाशांना या ठिकाणी गाडीतून उतरणे वा चढणे अडचणीचे ठरते. त्यामुळे असे प्रवासी नजीकच्या लांजा तालुक्यातील विलवडे स्टेशनचा गाडी पकडण्यासाठी आधार घेताना दिसतात. मात्र, विलवडे येथे जा-ये करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या खर्चिक बाब ठरते. त्यामुळे सौंदळ व्हॉल्टस्टेशनच्या ठिकाणी सर्व वयोगटातील प्रवाशांना सोयीचा ठरणार्‍या प्लॅटफॉर्मची उभारणे होणे गरजेचे आहे.
----------

सौंदळ व्हॉल्टस्टेशनला नियमित स्थानक दर्जाची प्रतीक्षा

विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यामध्ये सोल्ये येथे राजापूर रोड हे एकमेव स्थानक असून सौंदळ येथे व्हॉल्टस्टेशन उभारण्यात आलेले आहे. मात्र, त्या तुलनेने विस्ताराने लहान असलेल्या नजीकच्या लांजा तालुक्यामध्ये विलवडे, आडवली आणि वेरवली अशी तीन स्थानके आहेत. त्यामुळे विस्ताराने आणि लोकसंख्येने जास्त असलेल्या राजापूर तालुक्यातील जास्तीत जास्त प्रवाशांना कोकण रेल्वेच्या प्रवासाचा लाभ मिळण्यासाठी आणि या ठिकाणी कोकण रेल्वेमार्गावरील पॅसेंजरसोबत जलदगतीच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी सौंदळ व्हॉल्टस्टेशनला नियमित स्थानकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.

सौल्ये आणि सौंदळ येथे गाड्यांचे थांबे वाढणे अपेक्षित

सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकावर कोकण कन्या, मांडवी, तुतारी, दिवा-सावंतवाडी या गाड्या सद्यःस्थितीमध्ये थांबतात. हंगामामध्ये एखाद दुसर्‍या नव्या गाडीलाही थांबा दिला जातो. दादर-रत्नागिरी-मडगाव या गाडीला या ठिकाणी ये-जा च्या कालावधीमध्ये थांबा होता. सद्यःस्थितीमध्ये ही गाडी बंद आहे. सौंदळ येथे दिवा पॅसेंजर ही एकमेव गाडी थांबते. दादर-रत्नागिरी-मडगाव गाडीला सौंदळ येथे रात्रीचा थांबा होता; मात्र गाडी बंद असल्याने फक्त प्रवाशांना या ठिकाणी दिवा पॅसेंजरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणांहून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या पाहता या ठिकाणी आणखीन काही गाड्यांना थांबा मिळणे गरजेचे आहे जेणेकरून, प्रवाशांना प्रवास करणे अधिक सोयीचे ठरेल.

स्टेशनहून राजापूरचा प्रवास महागडा
मुंबई-राजापूर असा सुमारे पाचशे किमी कोकण रेल्वेच्या प्रवासासाठी प्रवाशांना सरासरी ११० ते १६५ रूपये जनरल तिकीटासाठी मोजावे लागतात. सर्वसामान्यांसाठी खासगी वा लक्झरी गाड्यांच्या भाड्याच्या तुलनेमध्ये कोकण रेल्वेप्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. त्यामुळे मुंबईतून येण्यासाठी सर्वसामान्यांकडून रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. मात्र, कोकण रेल्वेच्या सोल्ये येथील स्थानकावरून सुमारे पंधरा ते वीस किमी अंतरावरील राजापूर शहरामध्ये येण्यासाठी प्रवाशांना खासगी गाडीसाठी मुंबई ते राजापूर रेल्वे प्रवासाच्या तिकिटापेक्षापेक्षा जादा रुपये मोजावे लागत आहेत. या ठिकाणाहून राजापुरात येण्यासाठी स्वस्तातील एसटी गाडी आहे. मात्र, त्यामध्ये नियमित गावोगावच्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने अनेकवेळा त्यामध्ये जागा मिळत नाही. अशा स्थितीमध्ये खासगी गाड्यांमधून राजापूरला प्रवास करणे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महागडा ठरताना दिसत आहे.

सरकता जिना, बुकिंग सुविधेची अपेक्षा

सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकाच्या ठिकाणी सरकता जीना वा लिफ्टची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे गाडीतून उतरल्यानंतर प्रवाशांना अनेक पायऱ्‍या चढून वर यावे लागते. खांद्यावर सामान घेऊन पायऱ्‍या चढणे वयोवृद्धांसह महिलांसाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे या ठिकाणी अन्य ठिकाणी असलेल्या सरकता जिना वा लिफ्टच्या सोयीप्रमाणे या ठिकाणीही सरकता जिना वा लिफ्टची उभारणी करणे गरजेचे आहे. सोल्ये वा सौंदळ रेल्वेस्टेशन शहरापासून खूप दूरवर आहेत. त्यामुळे रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी त्या ठिकाणी जा-ये करणे अधिक खर्चिक ठरते. त्यामुळे राजापूर शहरामध्ये पोस्ट कार्यालय वा अन्य ठिकाणी त्याची बुकिंग व्यवस्था करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक पातळीवरून केली जात आहे. कोकण रेल्वेने प्रवास करणार्‍या तालुक्यातील प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, तुलनेने या ठिकाणी राखीव तिकीट कोटा कमी आहे. त्यामुळे तिकीट कोटा वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
-------------
एकातरी स्थानकाला मधु दंडवतेंचे नाव हवे

कोकणामध्ये रेल्वे धावण्यामध्ये संसदेमध्ये राजापूरचे नेतृत्व केलेले माजी खासदार (कै.) मधू दंडवते यांच्या सहकार्‍यांसमवेत महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. आजही ‘दंडवते साहेबांनी आणलेली रेल्वे’ अशी सर्वसामान्यांमध्ये कोकण रेल्वेची ओळख आहे. या रेल्वे प्रवासमार्गाचे ‘कोकण रेल्वे’ असे त्या वेळी नामकरण करण्यात आले असले तरी त्याच्या उभारणीमध्ये योगदान देणारे माजी खासदार (कै.) मधू दंडवते यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचे अन् योगदानाचे खर्‍या अर्थाने सार्‍यांना स्मरण होणार आहे. सर्वसामान्यांमधून कोकण रेल्वेला वा कोकण रेल्वेमार्गावरील एखाद्या स्थानकाला ‘(कै.) मधू दंडवते’ असे नामकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------
फोटो ओळी
-rat२१p३८.jpg- rat२१p३८ अनिल भोवड
कोट

राजापूर रोड स्थानकावर (रेल्वेस्टेशनवर) उदवाहक (लिफ्ट) सुरू करावी, फलाट क्र. दोनचे काम तातडीने करावे, कोविड काळात बंद करण्यात आलेल्या तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यामध्ये वाढ करावी, जनशताब्दी, गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस, दक्षिणेसह थेट दिल्ली त्या परिसरातील राज्यांमध्ये जाणार्‍या गाड्या वा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूर रोडवर आणि सौंदळ येथे थांबा मिळावा. राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर अशी बससेवा सुरू करावी. कोकण रेल्वे प्रशासनाने मागण्यांची पूर्ती केल्यास रेल्वेप्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होईल.
--अनिल भोवड, अध्यक्ष, पंचक्रोशी ग्रामविकास समिती
--------------
फोटो ओळी
-rat२१p४०.jpg- शरद देसाईKOP23L84345

कोट
प्रवाशांच्यादृष्टीने सौंदळ व्हॉल्टस्टेशन उपयुक्त ठरत आहे. मात्र या ठिकाणी प्लॅटफॉर्म नसल्याने गाड्यांमध्ये वयोवृद्धांसह महिला प्रवाशांना चढणे-उतरणे त्रासदायक ठरते. त्यामुळे या ठिकाणी प्लॅटफॉर्मची उभारणी गरजेची आहे. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना लाभ मिळण्यासाठी आणि या ठिकाणी कोकण रेल्वेमार्गावरील पॅसेंजरसोबत जलदगतीच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी सौंदळ व्हॉल्टस्टेशनला नियमित स्थानकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. त्याचवेळी सोल्ये येथील राजापूर रोडस्थानक आणि सौंदळ व्हॉल्टस्टेशनवर थांबणार्‍या गाड्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे.
--शरद देसाई, रायपाटण
------------
फोटो ओळी
-rat२१p३९.jpg- किशोऱ नारकरKOP23L84344

कोट
सौंदळ व्हॉल्टस्टेशनचा उपयोग पाचल परिसरातील लोकांना होत आहे. त्याचवेळी कोल्हापूरच्या अणुस्कुरा परिसरातील गावांमधील प्रवाशांना कोकण रेल्वेचा सौंदळ व्हॉल्टस्टेशन जवळ पडत असल्याने हे प्रवासी या ठिकाणी येण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, या ठिकाणी प्लॅटफॉर्म निर्मिती, तिकीट घर, प्रतिक्षालय यांसह प्रवाशांसाशाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांची उभारणी होणे गरजेचे आहे. या सुविधांची उभारणी झाल्यास सौंदळ व्हॉल्टस्टेशन प्रवाशांच्यादृष्टीने अधिक उपयुक्त ठरणार आहे.
-किशोर नारकर, सौंदळ रेल्वेस्टेशन निर्माण समिती सदस्य,
-----------
कोट
सौंदळ व्हॉल्टस्टेशन येथे आरक्षण कोटा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे अन्य स्टेशनप्रमाणे या ठिकाणी आरक्षण कोटा सुरू करावा. त्याचवेळी सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकावरील आरक्षण कोटा वाढवावा. दोन्ही ठिकाणी संख्यात्मकदृष्ट्या अधिक आरक्षण कोटा मिळाल्यास त्याचा फायदा राजापूरच्या प्रवाशांना निश्‍चितच होणार आहे.
--अमोल देसाई, प्रवासी