
खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
खेडमध्ये प्लास्टिक कचरा टाकू नका उपक्रम
खेड ः येथील नगर पालिकेने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मोहीम गतिमान केली आहे. या मोहिमेंतर्गत ''प्लास्टिक कचरा टाकू नका'' हा उपक्रम राबवण्यात आला. लोटेतील डाऊ केमिकल कंपनीचे माजी कर्मचारी विनायक वैद्य, चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. येथील नगर पालिकेच्या सभागृहात व्यापारी संघटना व व्यापाऱ्यांची सभा घेण्यात आली. शहरातून आठवड्यातून बुधवार व शनिवार असे दोन दिवस सह्याद्री निसर्गमित्र संस्थेमार्फत प्लास्टिक कचरा वेगळा गोळा केला जाणार आहे. या प्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद बुटाला, उपाध्यक्ष विश्वास पाटणे, राजन देसाई, सागर करवा, सुयोग बेडेकर, जावेद कौचाली, नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगांवकर, शहर समन्वयक मुक्ताई तिर्थकर उपस्थित होते. या अभिनव उपक्रमास व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------
प्राथमिक शिक्षक समितीची रविवारी विशेष सभा
राजापूर ः महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेची रविवारी (ता. २६) चिपळूण येथे जिल्हास्तरीय विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, माजी राज्याध्यक्ष विनायक घटे यांच्या उपस्थितीमध्ये होणार्या या सभेमध्ये संघटनात्मक पुनर्रचना करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. चिपळूण येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती कार्यरत असून, शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यात पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीला यश आले आहे. जिल्ह्यातील संघटनात्मक पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने ही विशेष सभा होणार असून या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नेते प्रदीप पवार व जिल्हा सल्लागार प्रकाश पाध्ये यांनी केले आहे.