
कुडाळात उद्या विविध कार्यक्रम
कुडाळात उद्या विविध कार्यक्रम
कुडाळः कुडाळ-औदुंबरनगर येथील देव औदुंबर येथे गुरुवारी (ता. २३) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी तीर्थप्रसाद, ३ वाजता औदुंबर मंडळ कुडाळचे भजन, सायंकाळी ५ वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ तेंडोली यांचा ''कल्पाक्ष गणेश'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. रात्री ८ वाजता ओंकार भजन मंडळ सरमळे-देऊळवाडीचे बुवा-संजय गावडे, विठुमाऊली भजन मंडळ, आंदुर्लेचे बुवा ऋषिकेश वेंगुर्लेकर, देवी भराडी भजन मंडळ, वाडीवरवडेचे बुवा सचिन धुरी यांच्यात तिरंगी भजनाचा सामना होणार आहे.
----------------
ओरोसला आज ‘रक्तांग चित्रांग’
ओरोसः ओरोस-सावंतवाडा येथील श्री देवी भवानी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उद्या (ता. २२) होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७ वाजता श्री देवी भवानी माता मूर्ती अभिषेक, ९ वाजता श्री धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२ ते ३ आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ वाजता स्थानिकांचे भजन, ७.३० वाजता चेंदवणकर दशावतार मंडळाचा ''रक्तांग चित्रांग'' हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
----------------
चित्रकलेत राणे, पेडणेकर प्रथम
कणकवलीः आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवे यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यात विविध गटांत निशांत राणे (विद्यामंदिर कणकवली), आयुष पेडणेकर (न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज फोंडाघाट) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण विद्यामंदिरचे कलाशिक्षक प्रसाद राणे व शिवडाव हायस्कूलचे कलाशिक्षक राजेश वाळके यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील कार्यक्रमात गौरविण्यात आले.
---------------
दाभोलीत बाल साहित्य संमेलन
वेंगुर्लेः दाभोली इंग्लिश स्कूल दाभोलीतर्फे २७ ला दुपारी ३ ते ५ या वेळेत दाभोली इंग्लिश स्कूल येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त बाल साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनास महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघ कार्यकारिणी सदस्य पांडुरंग सामंत, अवधूत नाईक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या साहित्य संमेलनात कविता वाचन व स्वरचित कविता वाचन, लघु नाटिका, विनोद, लघु कथा आदी बाल साहित्यिकांचे साहित्य संकलन, दाभोली पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी पांडुरंग सामंत पुरस्कृत ''मी वाचलेले पुस्तक'' या विषयावर मनोगत स्पर्धा व पुस्तक प्रदर्शन आयोजित केरले आहे. साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर यांनी केले आहे.
----------------
दाभोलीत विज्ञान जत्रेचे आयोजन
वेंगुर्लेः दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोलीतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २८ ला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत दाभोली इंग्लिश स्कूल येथे विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त वैज्ञानिक गुण व कल्पकता यांना वाव देणेसाठी स्वनिर्मित वैज्ञानिक उपकरण सादरीकरण, प्रयोगशाळा साहित्य परिचय, सादर केलेल्या उपकरणास व प्रयोग निर्मितीचा सन्मान केला जाणार आहे. माजी मुख्याध्यापक लक्ष्मण साळगावकर हे या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर यांनी केले आहे.
-----------------