
वेंगुर्लेत नाट्यमहोत्सवास प्रारंभ
वेंगुर्लेत नाट्यमहोत्सवास प्रारंभ
वेंगुर्ले ः येथील श्री देवी सातेरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत वेंगुर्ले सातेरी मंदिर येथे नाट्यमहोत्सवाला सुरुवात झाली. २७ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी सातला नामांकित मंडळाचे नाटक होणार आहे. २१ ला महापुरुष सावंतवाडी यांचा ‘शिव भांडारेश्वर’, २२ ला आजगावकर मंडळाचा ‘देव झाला गुराखी’ नाट्यप्रयोग झाला. २३ ला सिद्धेश्वर कसई-दोडामार्ग यांचा ‘बालहत्या’, २४ ला अमृतनाथ म्हापण यांचा ‘पहिला वारकरी’, २५ ला नाईक मंडळ झरेबांबर-दोडामार्ग यांचा ‘पाप गेले पुण्यापाशी’, २६ ला वावळेश्वर तेंडोलीचा ‘स्त्रीवेशधारी गणेश’, २७ ला मोरेश्वर मोरे यांचा ‘अकल्पासुर वध’ आदी नाट्यप्रयोग होणार आहेत.
--------------
सावंतवाडीत उद्या धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः भटवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिर देवस्थानचा चौदावा वर्धापन दिन उत्सव शुक्रवारी (ता. २४) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी सातला श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा, श्री दत्त महापूजा, लघुरुद्र, त्यानंतर सकाळी नऊला श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी बाराल आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक ते तीन महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी पाचला स्थानिक कलाकारांचे भजन, सायंकाळी साडेसहाला आरती, रात्री साडेसातला पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर रात्री साडेनऊला कारिवडे येथील श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘एक डाव नागिणीचा’ नाट्यप्रयोग होणार आहे.
--------------------
किनळोस आश्रमास जीवनावश्यक वस्तू
कुडाळ ः श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व श्री पुष्पसेन सावंत फार्मसी ल्युमनी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोशल फार्मासीस या विषयांतर्गत किनळोस येथील सक्षम आश्रमला भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी व परिसर ज्ञान या विषयांतर्गत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची या आश्रमास भेट होती. यावेळी अॅल्युमनी असोसिएशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रा. युवराज पांढरे, कॅम्पस डायरेक्टर नूतन पालव, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मडुरकर, आर्या तानावडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.