चार वर्षानंतर साकेडी सेवारस्त्याचे काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षानंतर साकेडी सेवारस्त्याचे काम पूर्ण
चार वर्षानंतर साकेडी सेवारस्त्याचे काम पूर्ण

चार वर्षानंतर साकेडी सेवारस्त्याचे काम पूर्ण

sakal_logo
By

84581
साकेडी : येथील एका बाजूच्या सेवारस्त्याचे काम चार वर्षानंतर पूर्णत्‍वास गेले आहे.

चार वर्षानंतर साकेडी सेवारस्त्याचे काम पूर्ण

ग्रामस्थांमधून समाधान; गटार, रेलिंगची कामे पूर्णत्‍वाची मागणी

कणकवली, ता.२२ : साकेडी (ता.कणकवली) येथील गोवा ते मुंबई या दिशेच्या सेवारस्त्याचे काम चार वर्षानंतर मार्गी लागले. याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त झाले. आता उर्वरीत गटार बांधकाम, सुरक्षा कठडे बसविणे, सेवा रस्त्यालगतची माती हटविणे आदी कामेही तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील साकेडी येथील भागाचे काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले; मात्र गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बाजूच्या सेवा रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते. त्‍यामुळे कणकवलीतून साकेडी गावात जाणाऱ्या नागरिकांना अनधिकृत मिडलकट ओलांडून धोकादायकरित्‍या रस्ता ओलांडावा लागत होता. तर साकेडी आणि अन्य गावातून कणकवलीकडे येणाऱ्या नागरिकांना दोन किलोमिटरचा वळसा घालून हुंबरट येथील अंडरपासमधून कणकवलीत यावे लागत होते.
साकेडी येथील सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश आमदार नीतेश राणे यांनी दोन महिन्यांपूर्वी ओम गणेश निवासस्थानी झालेल्‍या बैठकीत दिले होते. तसेच तातडीने काम पूर्ण न झाल्‍यास अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असा इशाराही श्री.राणे यांनी दिला होता. या बैठकीनंतर महिन्याभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तर गेल्‍या पंधरा दिवसापासून गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे काम सुरू केले होते. आज हा सेवारस्ता पूर्ण करून त्‍याचे डांबरीकरण करण्यात आले.
--
काही कामे अद्याप अपूर्ण
सध्या या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे आहेत. येथील गटार व्यवस्था पूर्ण झालेली नाही. तर काही भागातील गटारामध्ये मातीचा भराव टाकला आहे. या रस्त्यालगत संरक्षक कठडे नाहीत. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही. ही कामही तातडीने सुरू करावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.