
''त्सुनामी आयलंडसाठी'' मुख्यंमंत्र्यांना साकडे घालणार
swt231.jpg
84753
मालवणः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत.
‘त्सुनामी आयलंडसाठी’ मुख्यंमंत्र्यांना साकडे घालणार
ब्रिगेडीयर सुधीर सावंतः ‘फ्लोटिंग आयलंड’च्या धर्तीवर विकसित करण्यासाठी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : देवबाग हे आज जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. देवबागचा पूर्णपणे विकास करण्याचे नियोजन आम्ही केले असून दांडीप्रमाणेच देवबागच्या संपूर्ण किनारपट्टीवर बंधारा बांधण्यासाठी तसेच देवबाग खाडीतील नष्ट होत चाललेले त्सुनामी आयलंड फ्लोटिंग आयलंडच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी येथे दिली.
शिवसेना पक्षाचे नेते ब्रिगेडीयर सावंत यांनी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत देवबाग गावाची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, पराग खोत, महिला उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, बाळू नाटेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल आदी उपस्थित होते.
ब्रिगेडीयर सावंत म्हणाले, ‘‘देवबाग किनाऱ्यावर बंधारा होण्याच्या दृष्टीने आज आम्ही पाहणी केली. बंदर विभागाला देवबाग किनाऱ्याचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनीही दिले आहेत. पर्यटन विकास करताना पर्यटन हे स्थानिकांना रोजगार देणारे तसेच पर्यटकांना चांगली सेवा देणारे हवे. येथील निवास न्याहारी योजना उच्च दर्जाची होणे आवश्यक आहे. हॉटेल्सना ज्याप्रमाणे स्टार दिले जातात, तशी प्रमाण योजना निवास न्याहारीमध्ये राबवून शासनाकडून दर निश्चित झाले पाहिजेत. पर्यटनाशी संलग्न असलेल्या यासारख्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आज पर्ससीन व एलईडी लाईटसारख्या मासेमारीमुळे मासेमारी व्यवसायावर विपरित परिणाम झाला असून मासे मिळणे कठीण झाले आहेत. माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीत त्यावेळी एनसीडीसी योजनेतून ट्रॉलर देऊन चूक केली. त्याचा विपरित परिणाम आज दिसत आहे. म्हणूनच मासेमारी विषयक विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी पुढील महिन्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे देखील मच्छिमारांचे प्रश्न सोडवून त्यांचे कल्याण करण्यास प्रयत्नशील आहेत. शहरातील भुयारी गटार योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. ती का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करणार आहोत. शहरात घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. यासाठी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस कार्यक्रम जाहीर करणार आहोत. यासाठी नगरोत्थान योजनेतून २ कोटीचा निधी मिळावा, अशी मागणी शासनाकडे करणार आहोत. मालवणातील विविध प्रश्नांवर नागरिकांची लवकरच बैठक घेणार आहोत.’’