कणकवली नगरपंचायतीचा अर्थसंकल्प सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली नगरपंचायतीचा अर्थसंकल्प सादर
कणकवली नगरपंचायतीचा अर्थसंकल्प सादर

कणकवली नगरपंचायतीचा अर्थसंकल्प सादर

sakal_logo
By

कणकवली नगरपंचायतीचा अर्थसंकल्प सादर
नगरसेवकांकडून नवीन तरतुदी; खासदार, आमदार निधीच्या मुद्द्यावर टोलेबाजी
कणकवली, ता. २३: नगरपंचायतीचा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा १ कोटी ६१ लाख ४९ हजार ७०८ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायतीच्या सभागृहात सादर केला. एकूण ४८ कोटी ९६ लाख ८१हजार ७०० रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या. तर आमदार निधीसाठी पन्नास हजाराची तरतूद आणि खासदार निधीसाठी पंधरा लाखाची तरतूद ठेवण्यात आल्‍याच्या मुद्दयावर विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांत टोलबाजीही रंगली होती.
कणकवली नगरपंचायतीच्या सभेत सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्‍प मांडण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते संजय कामतेकर, विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक, नगरसेवक अॅड. विराज भोसले, अभिजित मुसळे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, माही परुळेकर रुपेश नार्वेकर, शिशीर परुळेकर, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या लेखापाल प्रियांका सोन्सुरकर यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला. यात नगरपंचायतीची प्रारंभीची शिल्लक ३ कोटी ६५ लाख ६७ हजार ४०७८ आहे. त्यामुळे या रकमेसह कणकवली नगरपंचायतीचा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा एकूण अर्थसंकल्प ५० कोटी ५८ लाख ३१ हजार ४०८ रुपयांचा आहे. या आर्थिक वर्षात महसुली जमा ८ कोटी ४६लाख ४२ हजार तर भांडवली जमा ३८ कोटी ४६ लाख २२ हजार रुपये होतील. यासर्व जमा झालेल्या निधी मधून ४८ कोटी ९६ लाख ८१ हजार ७०० रुपये हा सर्व खर्च वजा जाता १ कोटी ६१ लाख ४९ हजार ७०८ रुपये शिल्लक राहतील असा अंदाज या अर्थसंकल्पात वर्तविला आहे.

चौकट
नगरसेवकांनी केल्या अशा सुचना
या सभेत नगरसेवकानी अर्थ संकल्पावर आपली मते मांडली. तसेच काही तरतुदीत सुधारणा करण्याबाबत सुचविले. नगरसेवक अभिजित मुसळे यांनी अपंगासाठी असलेल्या निधींचे समप्रमाणात वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली. यावर समीर नलावडे यांनी अपंगासाठी असलेल्या निधीतून लाभार्थ्याला दुचाकी सारखे वाहन देण्याऐवजी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने घरघंटी, झेरॉक्‍स मशिन, शिलाई मशिन आदी वस्तू देण्यात यावी, अशी तरतूद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. तसेच शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ८ लाखांची तरतूद करण्यात आली असून ती वाढवून १५ लाखांपर्यंत करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना केली.