रत्नागिरी- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा
रत्नागिरी- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा

रत्नागिरी- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभा

sakal_logo
By

rat२३p३.jpg-KOP२३L८४७३७
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिरूप युवा विधानसभेत सहभागी झालेले विद्यार्थी, प्राध्यापक आणि र. ए. सोसायटीचे सचिव सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी.

विद्यार्थीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य
अभिरूप युवा विधानसभा ; गोगटे महाविद्यालयात उपक्रम
रत्नागिरी, ता. २३ ः राजकारणात सर्वच वाईट नसतात. काही असेही असतात जे पोटतिडकीने जनतेचे प्रश्न मांडत असतात. त्यामुळे युवकांनी राजकारणात येणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश शेवडे यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित अभिरूप युवा विधानसभा कार्यक्रमात बोलत होते.
महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या संकल्पनेतून अभिरूप युवा विधानसभा उपक्रम महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाला. यात महाविद्यालयातील काही विद्यार्थी सत्ताधारी पक्ष तर काही विद्यार्थी विरोधी पक्ष, पक्षनेते व सदस्यपदी विराजमान झाले. अभिरूप युवा विधानसभेच्या निमित्ताने विद्यार्थीदशेपासूनच या अभिरूप युवा विधानसभेच्या माध्यमातून राजकारणात सकारात्मकपणे काम करू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण होईल. विद्यार्थ्यांना स्वाभाविकच प्रश्न कसे विचारावेत? उत्तर कोणत्या पद्धतीने द्यावीत? विधानसभा व तिचे कामकाज कसे चालते याची माहिती होणार आहे. त्यामुळे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मुलांचा कृतिशील सहभाग वाखाणण्याजोगा होता. त्यासाठी प्रा. नीलेश पाटील, प्रा. सचिन सनगरे, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. जयंत अभ्यंकर, डॉ. अजिंक्य पिलणकर, प्रा. सीमा वीर, प्रा. पंकज घाटे, प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. मोहिनी बामणे, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. शुभम पांचाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाच्या प्रा. संयोगिता सासने, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. आनंद आंबेकर, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कला शाखा उपप्राचार्या तथा समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

चौकट १
प्रश्नोत्तरांचा तास
नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणे, शोकप्रस्ताव आणि यानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कोकणातील पाणवठे व त्यांची स्वच्छता, कोकणातील प्रकल्प व त्यांचे परिणाम, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, मुंबई-गोवा महामार्ग व त्या संदर्भातील प्रश्न, कोकणातील पर्यटन तसेच शिक्षण, आरोग्य, उद्योग या सारख्या विषयांवर विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारले. सत्ताधारी पक्षानेदेखील त्याला समर्पक उत्तरे दिली. राष्ट्रगीत होऊन विधानसभा अधिवेशनाची सांगता झाली.