संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५ साठी

पर्यावरण संस्थेतर्फे पर्यावरण प्रबोधन
रत्नागिरी ः येथील पर्यावरण संस्थेतर्फे शहर तसेच तालुक्यातील महाविद्यालये व माध्यमिक शाळांमधून पर्यावरण विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटो स्पर्धा, प्रश्नमंजुषा सारखे उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण प्रबोधनाचे कार्यक्रम माध्यमिक शाळांमधून घेतले जातात. यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल सैतवडा व मॉडेल स्कूल सैतवडा, माने इंटरनॅशनल स्कूल, कुवारबाव व महालक्ष्मी माध्यामिक विद्यालय-खेडशी, तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी व यशवंत माध्यमिक विद्यालय, निवळीतिठा तर स्वामी स्वरूपानंद विद्यालय पावस व लक्ष्मीकेशव विद्यालय फणसोप या शाळांमधून आयोजित केले होते. या उपक्रमात एकूण ७७५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने भातासाठी करण्यात येणारे भाजावळ, चिखलणी, डोंगरउतारावर करण्यात येणारी नाचणी, वारीची शेती, छोटी-मोठी कारखानदारी, माशांची हाताळणी, उत्सवामध्ये होणारे ध्वनी प्रदूषण यांची दखल घेणे कसे आवश्यक आहे याची माहिती पारदर्शिकांद्वारे आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. कोकणामध्ये वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन कसे आवश्यक आहे याची उदाहरणे दिली. उपक्रमामध्ये संस्थेचे डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ दिलीप सावंत व प्रा. प्राध्यापक गोपाळ कुलकर्णी यांचा सहभाग होता.

पांचाळ सुतार समाज मंडळाची २६ ला सभा
रत्नागिरी ः येथील पांचाळ सुतार समाज मंडळाची सभा येत्या रविवारी (ता. २६) दुपारी ३ वा. समाज मंडळाचे रमेश पांचाळ एमआयडीसी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या वेळी समाज मंडळाच्या नवीन कार्यकारिणी आणि समाजमंदिराच्या जागेसंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

84797
श्रीराम मंदिर वर्धापन दिनी भरतनाट्यम् मैफल
रत्नागिरी ः श्रीराम मंदिराच्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई श्री नृत्यकला मंदिरातर्फे आज सायंकाळी नृत्य नुपूरतर्फे भरतनाट्यम् मैफलीचा बहारदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. श्री राममंदिरातील सर्व महिला भजनमंडळातर्फे तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. वैभवी पवार नृत्य विशारद हिने बहारदार कार्यक्रम अत्यंत तन्मयतेने करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या वेळी वैभवीच्या गुरू मिताली भिडे नृत्य अलंकार यांनी या नृत्यमैफलीचे संचालन केले. श्रीरामाचे गुणगानपर आधारित नृत्यशैलीचा आविष्कार पेश केला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रांगणामध्ये नटराजमूर्तीचे पूजन संस्थेचे पदाधिकारी यांनी केले तर श्रीराम महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिला नलावडे, मराठा मंडळाच्या वंदना देसाई, भजनसम्राज्ञी सुषमा भाटकर, शिल्पा खानविलकर आदींनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा आरंभ केला. आज सकाळी मंदिरामध्ये श्री सत्य नारायणाची महापूजा करण्यात आली तर दिवसभर श्रीराम मंदिराच्या भजनसेवेतील नामवंत भजन मंडळांनी दिवसभर भजनाचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.


तळेत सायकल वाटप
खेड ः चिपळूण रोटरी क्लब भावी असिस्टंट गव्हर्नर प्रशांत देवळेकर यांच्या सहकार्याने व लोटे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कुंदन मोरे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील तळे येथे आठ दिव्यांगांना सायकली वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी सरपंच शामराव मोरे, उपसरपंच भरत महाडिक, ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे, शिवसेना विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, समाजसेवक मधुकर जाधव, उद्योजक प्रफुल मोरे, उद्योजक विलास गुजर, उद्योजक नीलेश आंब्रे, उदय महादे, ऋषिकेश जाधव आदी उपस्थित होते.


आयसीएस महाविद्यालयात कार्यशाळा
खेड ः सहजीवन शिक्षणसंस्था संचलित येथील आयसीएस महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विविध विषयांवर एकदिवशीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त डॉ. दिवेश गिन्नारे यांनी एनसीसी व एनएसमधून कोणत्या प्रकारचे करिअर घडू शकते, असे सांगितले. प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना स्थलांतरविषयक माहिती दिली. रत्नागिरी येथील सायबर क्राईमच्या पोलिस उपनिरीक्षक पुरळकर यांनी सोशल मीडियाचा वाढता वापर व सायबर गुन्हे या विषयी उदाहरणांसह माहिती देत सायबर क्राईमपासून कसे सुरक्षित राहिले पाहिजे, असे आवाहन केले. रायगड येथील काशिनाथ कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव कथन करत विविध प्रात्यक्षिके दाखवली.