
मालवणच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून निधी
मालवणच्या विकासासाठी
भाजपच्या माध्यमातून निधी
धोंडू चिंदरकर ः राणेंचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : मागील अडीच वर्षे विकासात्मक निधीपासून वंचित असलेल्या तालुक्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यातून तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वेगवेगळ्या विकासकामांत प्राप्त निधीत प्रत्येक हेडला मालवणची विशेष छाप जिल्हास्तरावर निधीच्या रुपात दिसली आहे. याची सविस्तर माहिती प्रत्येक गावागावांत जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मालवणवर अन्याय होता कामा नये, याची विशेष काळजी घेतली. याकामी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काटेकोरपणे पालन करत विशेष सहकार्य केले. याबद्दल या सर्व नेत्यांचे तालुक्याच्या वतीने जाहीर ऋण व्यक्त करत आहे. येणाऱ्या बजेटमध्ये तालुक्यातील बहुतांशी कामे सुद्धा तालुक्याचीच राहतील, याची काळजी घेतली जाईल. तसा पाठपुरावा करून कुठल्याही गावावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे चिंदरकर यांनी म्हटले आहे.