
शहीद जवान जयंत तांबडे यांची पत्नीही देशसेवेत
rat२४p१४.jpg
८४९७४
प्रियांका तांबडे
-----------------
शहीद जवान जयंत तांबडे यांची पत्नीही देशसेवेत
ताम्हणमळ्याची सून; वारसा टिकवण्यासाठी घेतला निर्णय
चिपळूण, ता. २४ः ताम्हणमळा येथील प्रियांका तांबडे यांचे पती जयंत सैन्यदलात सेवेत असताना शहीद झाले. कुटुंबातील देशसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रियांका यांनीही सैन्यदलातच भरती होण्याचा निर्णय घेतला. दोन लहान मुलांपासून हजारो किमी लांब राहून त्या जम्मू-कश्मीर येथे सेवा बजावत आहेत. तांबडे कुटुंबीयांच्या या सुनेने खडतर प्रवास करत इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
भोम गवळवाडी (ता. चिपळूण) येथील प्रियांका यांचे १६ मे २००३ ला जयंत तांबडे यांच्याबरोबर लग्न झाले. लग्नानंतर नवऱ्याबरोबर मनाली (हिमाचल प्रदेश) येथे जावे लागल्याने त्यांनी कॉलेजला ब्रेक दिला. गरोदर राहिल्यामुळे तीन वर्षानंतर त्या पुन्हा भोम गावी आल्या. मे २०१८ मध्ये जयंत तांबडे यांनी कुटुंबाला चिपळूणातील फ्लॅटमध्ये शिफ्ट करून ते गोकुळाष्टमीला परत घरी येण्याचा वादा करून निघून गेले खरे; पण ते परत आलेच नाहीत. २ जुलै २०१८ ला हिमाचल प्रदेश येथे सेवा बजावत असताना ते शहीद झाले.
सासरे राजाराम, सासू राजेश्री, चार वर्षाचा मुलगा अंकित आणि सात महिन्याची मुलगी आर्या यांना संभाळण्याची जबाबदारी प्रियांका तांबडे यांच्यावर आली. गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. चिपळुणातील भिडे कुटुंबीयांनी कपड्यांसह वर्षभर अन्यधान्य पुरवले. प्रा. मिनल ओक, पुण्यातील माजी सैनिक जिताडे, परशुराम रुग्णालयातील डॉक्टर्स, शर्वी पाटील यांच्यासह चिपळूणमधील काही दानशूर लोकांनी मदत केली. या मदतीवर तात्पुरते कुटुंब चालले. पतीची पेन्शन सुरू होण्यासाठी त्यांना दीड वर्ष झगडावे लागले. मुलांचे करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चिपळुणातील दुचाकीचे शोरूम, अपरांत रुग्णालय येथे नोकरी केली. नोकरी करता करता २०१९ मध्ये बीकॉमचे अर्धवट राहिलेले शिक्षण ७०.५७ गुण मिळवून पूर्ण केले. नंतर पाग येथील ग्रामसेवकांच्या पतसंस्थेत अकाउटंट म्हणून दोन वर्ष काम केले. या दरम्यान सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. टायपिंग आणि जीडीसीएचा डिप्लोमा पूर्ण केला. भरतीपूर्व परीक्षा आणि मेडिकल चाचणीमध्ये यशस्वी झाल्यानंतर अखेर १ सप्टेंबर २०२२ पासून पुणे येथे सैन्यभरती प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे त्यांना पत्र आले. १२ नोव्हेंबर २०२२ ला अडिच महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना जम्मू-कश्मीर येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये एलडीसी रॅन्कसाठी नियुक्ती देण्यात आली. त्यांची दोन्ही मुले चिपळूणमध्ये सासू, सासरे सांभाळत आहेत. मुलांपासून हजारो किमी लांब राहून त्या देशसेवा करत आहेत. त्यांचा मुलगा अंकित चौथीमध्ये तर मुलगी आर्या सीनियर केजीमध्ये शिकत आहे.
कोट
मुलांनाही देणार सैनिकी संस्कार
सैन्यदलात भरती होईपर्यंतचा प्रवास खडतर होता; पण कुटुंबातील सदस्य प्रवीण तांबडे, प्रमोद ठसाळे त्यांची पत्नी श्रेया ठसाळे यांनी मोलाची साथ दिली. मला दुसरी नोकरी करता आली असती; परंतु माझे पती देशसेवा करताना शहीद झाले. सैन्यदलातील त्यांची जागा मी घेऊ शकत नाही; परंतु माझे आयुष्य देशासाठी कामी यावे. पुढे मुलांनीही तोच वारसा चालवावा यासाठी मी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. मुलांनाही सैनिकी संस्कार मिळावे यासाठी लवकरच त्यांना आणि सासू, सासरे यांना मी काश्मीर येथे आणणार आहे.
- प्रियांका तांबडे, सैनिक