
गणेश मूर्तिकारांचा उद्या माजगावला मेळावा
गणेश मूर्तिकारांचा उद्या माजगावला मेळावा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचा मेळावा रविवारी (ता.२६) दुपारी अडीचला माजगाव येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये आयोजित केला आहे. नाशिक पंचवटी येथे मूर्तिकारांची नुकतीच बैठक आयोजित केली होती. यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्ती वापराबाबत घेतलेला निर्णय, नागपूर खंडपीठाचा निर्णय तसेच महानगरपालिकेने घेतलेल्या कामाचा आढावा याबाबत चर्चा झाली. त्याबाबत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पीओपी बंदीबाबत चर्चा करून योग्य निर्णय व ठराव घेणे, नाशिक येथे झालेल्या चिंतन बैठकीची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. याला सर्व मूर्तिकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत व उदय अळवणी यांनी केले आहे.