
तळवडे येथे पाच मार्चला ‘युवा उत्सव’चे आयोजन
85384
बांदा ः स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले ग्रामस्थ. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यात स्मशानभूमीची
श्रमदानातून स्वच्छता
बांदा ः शहरातील निमजगा-गवळीटेंब-शेटकरवाडी येथील तरुणांनी ज्येष्ठ नागरिक हनुमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील स्मशानभूमीची एकत्र येत श्रमदानाने दुरुस्ती व स्वच्छता केली. दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून स्मशानभूमीला नवी झळाळी प्राप्त करून दिली. स्वच्छता मोहिमेत स्मशानभूमी परिसरात वाढलेल्या झाडीची साफसफाई करण्यात आली. तसेच शेडची देखील दुरुस्ती करण्यात आली. उन्हाळी दिवसांकरिता नवीन दहन जागा व शेडची डागडुजी तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरुस्ती करण्यात आली. नागरिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी तेथेच तिन्ही वाड्यांचे स्नेहभोजनही करण्यात आले. त्यानंतर वाड्यांमधील रस्त्यांना पडलेले खड्डे या तरुणांकडून बुजविण्यात आले. या कार्यात ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर यांच्यासह गोविंद वराडकर, उमेश तोरस्कर, अशोक नाईक, रामा पेडणेकर, अशोक मंजिलकर, संजय नाईक, पप्या वझरकर, रामदास सावंत, विराज देसाई, गुरू कल्याणकर, पंकज देसाई, सिद्धेश केसरकर, महादेव आईर, मोहन सावंत, सुशांत वराडकर, रवींद्र सावंत, कैलास सावंत, टमा वडार, सुनील धोत्रे, ओंकार सावंत, सतीश शेटकर, अभिजित देसाई, व्यंकटेश उरुमकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
---
तळवडेत पाच मार्चला ‘युवा उत्सव’
वेंगुर्ले ः युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींना नवचेतना देण्याच्या उद्देशाने ५ मार्चला सकाळी दहाला श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथे जिल्हास्तरीय ‘युवा उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. कविता लेखन, चित्रकला, मोबाईल वक्तृत्व, फोटोग्राफी, समूहनृत्य (लोकनृत्य देशभक्तीपर) आयोजन केले आहे. स्पर्धा १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींसाठी आहे. काव्यलेखनासाठी ‘ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि बलिदान’, ‘स्वातंत्र्य लढा -भारताचा समृद्ध वारसा’, ‘विविधतेतील एकता’, ‘राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान’, या पाचपैकी एक विषय स्पर्धास्थळी दिला जाईल. अधिक माहितीसाठी सचिन परुळकर यांच्याशी संपर्क साधावा.
--
नांदगावला उद्या विविध कार्यक्रम
कणकवली ः नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेच्यावतीने मंगळवारी (ता. २८) विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी नऊला महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, एकला महाप्रसाद, दुपारी दोनला स्थानिक भजने, तीनला हळदीकुंकू, सायंकाळी चाकला गुंडू सावंत विरुद्ध संदीप लोके यांच्यात टी-ट्वेन्टी डबलभारी भजनाचा सामना होणार आहे. रात्री दहाला कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांची ट्रिकसीनयुक्त ‘अजिंक्यतारा’ नाटक होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहवे, असे आवाहन सन्मित्र रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
--------------
वैश्यवाणी समाज अध्यक्षपदी मोरये
कणकवली ः नांदगाव (ता.कणकवली) येथील वैश्यवाणी समाजाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद माजी सदस्य नागेश मोरये, तर सचिवपदी ऋषिकेश मोरजकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष शशिकांत शेटये, उपाध्यक्ष पंढरीनाथ पारकर, खजिनदार मारुती मोरये, सहसचिव दिलीप फोंडके, सहखजिनदार रविराज मोरजकर यांचा समावेश आहे. वैश्य समाज असलेल्या प्रत्येक वाडीतील जास्तीत जास्त सभासद घेऊन जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
----------------
वेंगुर्लेत आज काव्यवाचन
वेंगुर्ले ः येथील नगर वाचनालय संस्थेतर्फे दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमिंत नगर वाचनालयात उद्या सायंकाळी ४ वाजता काव्यवाचन कार्यक्रम आयोजित केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांची एक कविता सादर करावी. विद्यार्थ्यांनी तसेच शाळांनी सहभागी विद्यार्थ्यांची नावे २७ फेब्रुवारीला सकाळी दहा पर्यंत संस्थेत आणून द्यावीत. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
.................
मालवणात सवेश नाट्यगीत स्पर्धा
मालवण ः येथील अष्टपैलू कलानिकेतनतर्फे ४ मार्चला भरड दत्त मंदिर येथे सायंकाळी साडेसहाला नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी दिली. नावनोंदणीची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी असून रत्नाकर सामंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---
कणकवली परिसरात पारा तापला
कणकवली ः शहर आणि परिसरात उन्हांचे चटके बसु लागले आहेत. गेल्या काही दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. वातावरणातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत घरा बाहेर पडने अशक्य होत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आंबा काजू उत्पादनावर झाला आहे.
----------
फोंडाघाट येथे थंडी गायब
फोंडाघाट ः येथील पंचक्रोशीतून थंडी गायब झाली आहे. पहाटेला थोडासा गारवा वगळता दिवसभर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. त्याचा ही परिणाम होत असून जंगलात आगी लागत असल्याने उष्णतेच्या पाऱ्यात वाढ झाली आहे.