रत्नागिरी-वाटद सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-वाटद सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर
रत्नागिरी-वाटद सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रत्नागिरी-वाटद सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

sakal_logo
By

वाटद सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर
एकतर्फी कारभाराबाबत तक्रार ; तहसीलदारांची उपस्थितीत बैठक
रत्नागिरी, ता. २६ ः तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधातील अविश्वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे हा अविश्वास ठराव मंजूर करताना सर्व पक्षांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. मतदानावेळी ठरावाच्या बाजूने १० तर ठरावाविरुद्ध केवळ १ मत पडल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला.
तालुक्यातील प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या वाटद ग्रामपंचायत सरपंच सौ. अंजली अनंत विभूते यांच्या विरोधात मागील काही कालावधी पासून तक्रारी वाढल्या होत्या. मनमानी आणि एकतर्फी कारभाराबाबत ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य नाराज होते. सरपंच अंजली अनंत विभूते यांच्या मनमानी कारभारा विरोधात ग्रामपंचायत सदस्य यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष करून सरपंच विभुते यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवल्याने ग्रामपंचायती मधील सर्वपक्षीय सदस्य सरपंच विभुते यांच्या विरोधात एकवटले. सरपंच विभुते यांचा मनमानी कारभार आणि गैरव्यवहाराविरोधात ग्रामपंचायत मधील सर्वपक्षीय सदस्य यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. यानुसार तहसीलदार शशिकांत जाधव अविश्वास ठरावाबाबत लेखी अर्ज करण्यात आला.
सदस्यांच्या लेखी अर्जनुसार २४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी वाटद ग्रामपंचायत येथे उपस्थित राहून या अविश्वास ठरावाची खातरजमा करून घेण्यासाठी मतदान मतदान प्रक्रिया घेतली. यावेळी विद्यमान सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधात १० विरूद्ध तर बाजूने केवळ १ असे मतदान झाले. झालेल्या मतदानानुसार तहसीलदार यांनी शासन निर्णय व नियमाची खातरजमा करून अविश्वास ठराव मंजूर केला. या निर्णयानंतर वाटद गावातील ग्रामस्थ, व्यापारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

चौकट
सरपंचांचे निर्णय व्यापाऱ्यांना त्रासदायक
सरपंच कालावधीत अंजली विभुते यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका हा येथील स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना बसला होता. यातूनच सरपंच विभुते यांच्या विरोधात मोठा उठाव झाला आणि सर्वपक्षीय सदस्य विभुते यांच्या विरोधात एकवटले. विभुते यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर होताच येथील सर्वसामान्य व्यापार्‍यांना दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.