गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा 
गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा
गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा

गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा

sakal_logo
By

85481
कणकवली ः येथील शिवसंवाद मेळाव्यात बोलताना सुभाष देसाई. शेजारी आमदार वैभव नाईक, प्रदिप बोरकर, संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर आदी.

गद्दारांचे कटकारस्थान हाणून पाडा

सुभाष देसाई; कणकवलीत शिवगर्जना शिवसंवाद मेळाव्यात आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः हिंम्मत असेल तर निवडणुका घ्या. खरे कोण? खोटे कोण? हे लोक ठरवतील. पक्षातून फितूर झालेल्या गद्दारांचे कटकारस्थान निस्तेनाबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवगर्जना शिवसंवाद मेळावा आज येथील मातोश्री मंगल कार्यालयात झाला. यावेळी सुभाष देसाई बोलत होते. या मेळाव्याला पक्ष संघटनेचे समन्वयक प्रदीप बोरकर, लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख नेहा माने, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, अतुल रावराणे, सुशांत नाईक आदी उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे पदाधिकारी होते. राज्यभरात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाकडून सध्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. कुडाळ, मालवणनंतर आज कणकवली आणि वैभववाडीत शिवसेना प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसंवाद मेळावा येथे आयोजित केला होता.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्याला गद्दारी नवीन नाही. गद्दारीची कीड येथे फार विस्तारलेली आहे; पण, आम्हाला अभिमान आहे. यावेळेस सगळे निष्ठावंत नेते आणि शिवसैनिक पक्षासोबत राहिले. जिल्ह्यात फिरत असताना त्याची प्रचिती येत आहे. दोन-चार गेले म्हणून काही फरक पडत नाही. आता पुन्हा एकदा संधी आली आहे. कुडाळसोबतच यापुढे सावंतवाडी आणि कणकवली विधानसभेचा शिवसेनेचाच आमदार असेल. या मतदारसंघात अनेक लोक आपल्या सोबत आहेत. त्यांना गद्दारांनी केलेल्या कृत्याची आणि भाजपने घडवलेल्या या सगळ्या नाट्याची माहिती द्या. यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम समाजापर्यंत पोहोचवा. समाजातील तळागाळामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे? कशा पद्धतीने शिवसेना संपवण्याचे काम सुरू आहे, हे सांगा. नक्कीच यश मिळेल.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आज मातोश्रीवर अनेक निष्ठावंत येत आहेत. आंबेडकर चळवळीपासून कम्युनिस्ट आणि मुस्लिम संघटना तसेच दिल्ली, पंजाब राज्याचे मुख्यमंत्रीही येत आहेत. अनेक राज्याचे मुख्यमंत्री संपर्कात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे न डगमगणारे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यापुढे काम करा.’’
आमदार नाईक म्हणाले, ‘‘मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अखेरपर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहीन. पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मी मतदारसंघात आणली आहेत. लोक आमच्यासोबत आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ४५० कोटीची कामे सुरू केली आहेत. जिल्हात अनेक विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली. आता आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष आपल्यासाठी नवा नाही. यश निश्चितच मिळेल. परंतु, प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्ष संघटनेसाठी योगदान दिले पाहिजे.’’
सतीश सावंत म्हणाले, ‘‘पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरले म्हणून पक्ष संघटना संपत नाही. आज लोक आपल्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाने पक्षाच्या पुढच्या भूमिकेबाबत जनमाणसांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. तळागाळापर्यंत पक्षाच्या माध्यमातून विकास काम पोचवा. मागील सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे काम यशस्वीरित्या पुढे आले आहे. या ही मतदारसंघांमध्ये किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार कोण आहे, त्याहीपेक्षा पक्ष संघटना वाढवायची आहे. त्यामुळे पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची ताकद तुम्ही ठेवली पाहिजे." प्रदीप बोरकर यांनी संघटना पातळीवरील कार्यकर्त्यांचे महत्त्व आणि पुढील आवाहन स्वीकारून पुढे चला, असे आवाहन केले. अतुल रावराणे, संदेश पारकर, नेहा माने, संजय पडते आदींनीही मनोगत व्यक्त केले.
-----
चौकट
खरा प्रतिस्पर्धी भाजप
देशातील लोकशाही बुडवली जात आहे. हे सर्वसामान्य भारतीयांना ही समजलेले आहे. त्यामुळे आपला खरा प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. शिवसेना संपण्याच्या षड्‍यंत्रात सुत्रधार कोण? हे जनतेला ठावूक आहे. या देशात २०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजप सत्तेत येणार नाही. त्यामुळे फितुरांना सोबत घेऊन शिवसेना संपवणाऱ्यांना आवाहन आहे, ‘डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुनकीन है..’, असा टोला देसाई यांनी लगावला.