
जिल्ह्यातून 200 आशा गटप्रवर्तक दिल्लीत धडकणार
rat२७१६.TXT
बातमी क्र. १६ (टुडे ३ साठी)
आशा गटप्रवर्तक दिल्लीत धडकणार
आयटकचे २८ मार्चला आंदोलन ः दरमहा २५ हजार वेतनाची मागणी
रत्नागिरी, ता. २७ : आशा गटप्रवर्तक महिलांना व सर्वच योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा २५ हजार रुपये किमान वेतन द्या, या मागणीसाठी दिल्ली येथे आयटक कामगार संघटनेतर्फे २८ मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २०० महिला जाण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.
शहरातील मारुतीमंदिर येथील महिला मंडळ सभागृहात आशा व गटप्रवर्तक यांचा महिला मेळावा पार पडला. यावेळी युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते शंकर पुजारी उपस्थित होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई व आयटकचे नेते प्रकाश रेड्डी, संघटनेचे सचिव सुमन पुजारी, विद्या भालेकर, पल्लवी पालकर, तनुजा कांबळे, वैशाली तांबट, संजिवनी तिवरेकर आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये बोलताना शंकर पुजारी म्हणाले, आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची तयारी महाराष्ट्र शासनाची नसल्यामुळे त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. २०१८ सालापासून भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक महिलांच्यासाठी काहीही मानधनांमध्ये वाढ केलेली नाही. म्हणूनच सर्व योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना दरमहा ताबडतोब पंचवीस हजार रुपये किमान वेतन सुरू झाले पाहिजे. यासाठी दिल्लीच्या मोर्चासाठी जोरदार तयार करावी. या मेळाव्यामध्ये बोलताना संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी म्हणाल्या, सर्व महाराष्ट्रातून दिल्ली मोर्चास जाण्याची तयारी सुरू आहे. म्हणूनच कोकणामधून सुद्धा जोरदार तयारी करावी.