
रत्नागिरी- हिंदुत्व ग्रंथाने हिंदूंना दिली उर्जा
rat२७p२६.jpg
L८५६४१
रत्नागिरी : ओम साई मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात व्याख्याते दिलीप गोखले यांचा सत्कार करताना मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे.
---------------
सावरकरांच्या हिंदुत्व ग्रंथातून हिंदूंना उर्जा
दिलीप गोखले; सर्व हिंदूंनी संघटित होणे गरजेचे
रत्नागिरी, ता. २७ : आमचा देश नेमका कोणता, त्यात राहणारे हिंदू म्हणजे नेमके कोण, हिंदू कोणाला म्हणावे, याचे सुस्पष्ट विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व या ग्रंथात मांडले आहेत. या ग्रंथामुळे हिंदू धर्मातील सर्व पंथ, उपपंथ, राष्ट्र आणि धर्म यासाठी कार्य करणाऱ्या तत्कालीन सर्व संघटना यांच्यामध्ये हिंदुत्वाची जाणीव निर्माण झाली असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे दिलीप गोखले यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्व या ग्रंथाच्या शताब्दीनिमित्त नाचणे- साळवी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
या वेळी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी श्री. गोखले यांचा सत्कार केला. श्री. गोखले म्हणाले, स्वा. सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथात हिंदू शब्दाची व्याख्या सांगितली. आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका, पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:. याचा अर्थ सिंधू नदीच्या उगमस्थानापासून सिंधू सागरापर्यंतची जी विस्तृत भूमी भारत, ही जी ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो म्हणजे हिंदू. केवळ भारतात जन्म झाला अथवा त्याचे आई-वडील इथे राहतात म्हणून तो हिंदू होत नाही, तर ती त्याची पुण्यभूमी आहे, तो हिंदू. या देशातील सनातन हिंदू धर्म संस्कृती यांना जो मानतो, ज्यांच्या उपासना, देवता, श्रद्धास्थान यांचे उगमस्थान भारत आहे, तो म्हणजे हिंदू. या अर्थाने भारतातील आर्य, द्रविड, बौद्ध, जैन, शीख हे सगळे हिंदूच आहेत. बौद्ध, जैन, शीख, लिंगायत या पंथांचे निर्माते भारतातच जन्मले म्हणून ते हिंदूच आहेत, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या या व्याख्येवरून स्पष्ट होते. श्री. गोखले म्हणाले, १९२१ मध्ये स्वा. सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले.