
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीत १० मार्चला शिवजयंती शोभायात्रा
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीत
१० मार्चला शिवजयंती शोभायात्रा
रत्नागिरी, ता. २५ : प्रतिवर्षाप्रमाणे येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने १० मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेला सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथून प्रारंभ होऊन रात्री ९ वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होईल.
या मिरवणुकरिता समाजबांधवांनी दुपारी ३.३० वाजता क्षत्रिय मराठा मंडळाच्या गोडबोले स्टॉप, सिध्दीविनायक रेसिडेन्सी येथील कार्यालयात पारंपरिक वेशभुषेत एकत्र जमावे. तेथे फेटे बांधून रत्नदुर्ग किल्ल्यावर दुचाकीवरुन पुरुष व स्त्रिया जाणार आहेत. त्यानंतर देवी भगवतीच्या मंदिरातुन शिवज्योत घेऊन जयस्तंभ येथे येतील. जयस्तंभ येथे आगमन झाल्यावर ५.३० वाजता शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीला आरंभ होणार आहे.
मिरवणुकीत ढोल, ताशे, झांजपथक मर्दानी खेळ व महाराजांच्या जिवनावरील चित्ररथ यांचा समावेश असेल या शोभायात्रेमध्ये चित्ररथांचा समावेश करावयाचा असेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधावयाचा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिवप्रेमी व मराठा समाज बंधु - भगिनिंनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे.