
बांदा उड्डाणपूल मोजणी प्रक्रिया
85670
बांदा ः येथे सीमांकन करताना भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी.
85671
बांदा ः येथे स्थानिकांना १९९१ चा जमीन संपादित नकाशा दाखविताना अभिलेखचे अधिकारी. (छायाचित्रे - नीलेश मोरजकर)
बांदा उड्डाणपूल मोजणी प्रक्रिया
सीमांकन निश्चित; आज ठरणार अंतिम नकाशा, अतिक्रमण हटविणार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः बांदा कट्टा कॉर्नर येथील प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उड्डाणपूलासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी प्रक्रिया आजपासून सुरु केली. महामार्गसाठी १९९१ ला करण्यात आलेल्या जमीन संपादित नकाशाप्रमाणे आज सीमांकन निश्चित करण्यात आले. उद्या (ता.२८) महामार्गाच्या दोन्ही बाजूकडून हद्द निश्चित करून संपादित जमिनीचा नकाशा राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात येणार आहे. दरम्यान, चार दिवसात अतिक्रमण हटविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून हाती घेतले जाणार आहे.
याठिकाणी ६०० मिटर लांबीचे उड्डाणपूल मंजूर आहे. काही दिवसांपूर्वी सीमांकन चुकीचे असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाच्या नकाशाप्रमाणे मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांनी यासंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र देऊन अति-अतितातडीची मोजणी करण्याची लेखी मागणी केली होती. त्यानुसार हद्द कायम करण्यासाठी एकूण २७ सर्व्हे क्रमांकातील तब्बल ८६ गाळेधारकांना मोजणीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या.
आज सकाळी भूमी अभिलेख व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणीस प्रारंभ करण्यात आला. आज दिवसभर १९९१ च्या जमीन संपादित नकाशाप्रमाणे महामार्गाच्या दूतर्फा सीमांकन निश्चित करण्यात आले. यावेळी गाळेधारक व ग्रामस्थ उपस्थित होते. उद्या सकाळी १० वाजता हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी प्रारंभ करण्यात येणार आहे.
------------
कोट
अंतिम हद्द उद्या (ता.२८) कायम करण्यात येणार आहे. त्यानंतर नीस टाकून संपादित जमिनीचा नकाशा महामार्ग विभागाला देण्यात येणार आहे. मोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर चार दिवसात अतिक्रमण हटविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून हाती घेतले जाणार आहे.
- महेश खटी, उपअभियंता