देवगड नगरपंचायत सभेत खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड नगरपंचायत सभेत खडाजंगी
देवगड नगरपंचायत सभेत खडाजंगी

देवगड नगरपंचायत सभेत खडाजंगी

sakal_logo
By

65629

देवगड नगरपंचायत सभेत खडाजंगी

स्वतंत्र नळयोजना प्रस्ताव; मान्यतेसाठी मतदान, सत्ताधारी ठरावाच्या बाजुने

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः येथील शहरातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी सुमारे ६१ कोटी रूपये खर्चाच्या कोर्ले -सातंडी धरण प्रकल्पावरून संभाव्य स्वतंत्र नळयोजना प्रस्तावित करण्याला येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत मतदानातून मान्यता दर्शवण्यात आली. भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी यापूर्वीच्या योजनेच्या आराखड्याला मंजुरी मिळते काय पाहून नंतर याचा विचार करावा, अशी भूमिका घेतल्याने मतदान घेतले गेले. अखेर सत्ताधारी नगरसेवकांनी योजना प्रस्तावित करण्याच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, नळयोजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या विषयाबरोबरच अन्य विषयावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.
येथील नगरपंचायतीची सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते. सभेच्या पटलावर देवगड जामसंडे स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेच्या नवीन प्रस्तावाबाबत निर्णय घेण्याचा विषय ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (ता.२४) झालेल्या सभेत संभाव्य नळयोजनेचा आराखडा आणि त्यातील संभाव्य खर्च याची माहिती जीवन प्राधिकरणकडून नगरसेवकांना देण्यात आली होती. हाच धागा पकडून भाजप विरोधी नगरसेवकांनी आपल्याला याबाबत काहीच कल्पना नव्हती, त्यामुळे पुन्हा चर्चा करण्यात यावी, असा पवित्रा घेतला. त्यानुसार नगराध्यक्षांनी याची माहिती देताना शिरगाव पाडागर उद्भवावरून स्वतंत्र योजना करावयाची झाल्यास त्याला सुमारे ५४ कोटी इतका तर कुर्ली घोणसरी येथून योजना प्रस्तावित केल्यास सुमारे ७५ कोटी ६२ लाख खर्च अपेक्षित आहे. याला पर्याय म्हणून कोर्ले -सातंडी धरणावरून योजना प्रस्तावित केल्यास सुमारे ६१ कोटी खर्च अपेक्षित असून यातील कोर्ले सातंडी धरणावरून योजना करणे सोयीचे होईल, अशी पुस्ती जोडली. यावर विरोधी नगरसेवकांनी शिरगाव पाडागर योजनेसाठी आग्रह धरून आधी त्याला मंजुरी मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा नाहीतर कोर्ले-सातंडी धरणावरून योजना प्रस्तावित करावी असा मुद्दा मांडला. यावर यापूर्वी भाजप सत्तेत असताना योजेनेसाठी प्रयत्न का झाले नाहीत? असा सत्ताधार्‍यांनी सूर आळवताच यावरून वादंग झाला. विरोधकांनी दोन्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत असेही सुचवले. यावर बराच काथ्याकुट होऊन अखेर मतदानाने नवीन योजना प्रस्तावित करण्याला मंजुरी देण्यात आली. सत्ताधार्‍यांनी हात उंचावून याला सहमती दर्शवली. नगरपंचायतीच्या खुल्या क्षेत्राची छाननी करून अतिक्रमणे हटवण्याची मागणी करण्यात आली. याचिका संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या संबधित वकीलांचे देयक अदा करण्याच्या विषयावेळी विरोधी भाजप नगरसेवकांनी देयक अदा करण्याला सहमती दर्शवली. तर सत्ताधार्‍यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन मागवून पुढील निर्णय घेण्याचे सुचवले. यावर वकील नेमणे आवश्यक असल्याने मार्गदर्शन मागवण्याचे आवश्यक वाटत नसल्याचे मत मुख्याधिकार्‍यांनी नोंदवले. अखेर मार्गदर्शन मागवण्याचे ठरवण्यात आले. नगरपंचायत मालमत्तांची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याच्या विषयाला विरोध दर्शवण्यात आला.
..............
अभिनंदन ठरावांना सत्ताधाऱ्यांचा विरोध
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी सुमारे ४ कोटी ३५ लाखाचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नीतेश राणे यांचा, यात्रेपूर्वी कुणकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुतनीकरण झाल्याबद्दल तसेच शिंदेगटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याबद्दल भाजप नगरसेवकांनी मांडलेल्या अभिनंदन ठरावाला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध दर्शविला. पक्षाचे नाव आणि चिन्ह हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने ठराव घेता येणार नाही असे सांगितले.