
रत्नागिरी ः वारीशे कुटुंबीयांना वंचित बहुजन आघाडीतर्फे 50 हजार मदत
rat२८p९.jpg- KOP२३L८५७४१
रत्नागिरी - दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या आईचे सांत्वन करत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ५० हजाराची मदत देण्यात आली.
-------------
वंचित बहुजन आघाडीतर्फे
वारीशे कुटुंबीयांना ५० हजार मदत
रत्नागिरी, ता. २८ ः वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष आण्णा जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष रूपेंद्र जाधव, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर या तीन जिल्हाध्यक्षांनी काल (ता. २७) राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि मदत म्हणून ५० हजार रुपय वारीशे यांच्या आईकडे सुपूर्द केली.
वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जेरबंद करण्यात आला आहे. या सगळ्या धक्कादायक जीवघेण्या प्रकरणात वारीशे यांचे कुटुंब कोलमडून पडले. त्यांच्या कुटुंबाची व्यथा माध्यमांनी लावून धरत वास्तव जगासमोर आणले आणि कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला. अशातच अण्णा जाधव यांनीदेखील खारीचा वाटा उचलत वंचित बहुजन आघाडीतर्फे छोटीशी मदत करण्यात येईल, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. याप्रमाणे अण्णा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवंगत पत्रकार वारीशे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राजापुरातील कशेळी गावात पोहोचले; मात्र कशेळी गावातील घरी कोणीच राहत नसल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी वारीशे कुटुंब रत्नागिरी येथील नातेवाइकांकडे राहत असल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडीची टीम २७ फेब्रुवारीला सायंकाळी रत्नागिरीतील नातेवाइकांच्या घरी पोहोचली. या वेळी अण्णा जाधव यांनी रोख रक्कम ५० हजार रुपयांची मदत वारीशे यांच्या आईकडे सुपूर्द केली तर शिक्षण घेत असलेल्या वारीशे यांचा मुलगा यश यालाही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी कुटुंबीयांच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.
चौकट -
भूमाफिया आरोपी पंढरीनाथ आंबेरकरने पत्रकार वारीशे यांच्या अंगावर गाडी घालून खूनच केला. एवढा भयानक प्रकार घडवून आणणे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला हात लावणे किंवा लोकशाहीला उद्ध्वस्त करणे म्हणजेच सर्व जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. ही गदा कदापि आम्ही सहन करणार नाही. घटनात्मक दिलेल्या अधिकाराचा वापर करणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी असेल.
- विकास उर्फ आण्णा जाधव, उत्तर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी