संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

८५८२८
आवाशी शाळेत मराठी भाषा दिन
गावतळे ः दापोली तालुक्यातील जि. प. शाळा आवाशी नं. १ शाळेत मराठी मातृभाषा दिन उत्साहात पार पडला. जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून दर्जा प्राप्त झाला असून राष्ट्रगीताप्रमाणे रोज राज्यगीत गायन करायचे असल्याने पहिल्याच दिवशी राज्यगीत आणि मराठी मातृभाषा दिन लाठी, काठी, ढोलताशाच्या गजरात आवाशी येथे उत्साहात झाला. मुलींनी विविध रंगीत साड्या, तर मुलांनी कुर्ता पायजमा परिधान करत संस्कृतीदर्शन घडवले. लाठी फिरवण्याचे प्रात्यक्षिकही सादर केले. या वेळी विविध मराठी गीतांचे गायन करण्यात आले. या वेळी सरपंच सुवर्णा शेडगे, मुख्याध्यापक सुरेश पाटील, सहशिक्षक प्रकाश कांबरे, संजय गुडले आदी उपस्थित होते.


श्रीराम हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, श्रीराम हायस्कूल, हर्णै-पाज येथे १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास दापोली एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सौरभ बोडस, संचालक अशोक जाधव, मुख्याध्यापक चंद्रकांत पांढरे व ज्येष्ठ शिक्षक अनिल पेठकर, सोनाली मेहेंदळे, दिगंबर पावसे, मोहन पडवेकर, ओंकार बेडेकर, कविता मगर व शिक्षकेतर कर्मचारी हरी साळुंखे, राजू रूके, योगेश कांगणे उपस्थित होते. त्यांनी सर्व विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

दापोलीतील विद्याभारतीतमध्ये राजभाषा दिन
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित विद्याभारती शिशुवाटिका व प्राथमिक विभागामध्ये राजभाषादिन उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम मैदानात राष्ट्रगीताचे व राज्यगीताचे सामूहिकरित्या गायन करण्यात आले. त्यानंतर विद्याभारती शिशुवाटिका व प्राथमिक विभाग मिळून सर्व विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यात प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम सादर केले व पालखीत ग्रंथ ठेवून मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या मागोमाग सर्व विद्यार्थी रांगेत प्रभातफेरीत सहभागी झाले. फेरी शाळेतून निघून केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ नेण्यात आली. तेथे सर्वांनी महाराजांना वंदन करून बाहेरील पदपथावर पोवाडा व राज्यगीत सादर केले. त्यानंतर फेरी शाळेत नेण्यात आली. हा संपूर्ण कार्यक्रम विद्याभारती विभागप्रमुख निकिता परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
--------------------

दापोलीत आज महिलांसाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम
दाभोळ ः भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन्सद्वारा आयोजित पेन्शनर सभागृह दापोली येथे बुधवारी (ता. १ मार्च) सकाळी ११ ते २ या वेळेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांकरिता उद्योजकता परिचय व जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन्सद्वारा दापोली येथे एक महिना कालावधीचे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या प्रशिक्षणाची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरीता अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिला, युवती व बचतगटातील महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ईडीआयआय प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले आहे.