
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या बोधचिन्हाचे अनावरण
86013
विजयदुर्ग ः येथे ग्रामपंचायतीच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या बोधचिन्हाचे अनावरण
पर्यटनवृद्धीसाठी उपक्रम; ‘इतिहासातून समृद्धीकडे’चा संदेश
देवगड, ता. २८ ः तालुक्यातील विजयदुर्ग येथील ग्रामपंचायतीच्या बोधचिन्हाचे अनावरण अॅड एजन्सीज अॅन्ड मिडिया असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र (आसमा) संघटनेचे अध्यक्ष सुनील बासरानी तसेच विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाज काझी यांच्या हस्ते करण्यात आले. ऐतिहासिक विजयदुर्गाचे महत्त्व ओळखून आणि भविष्यात पर्यटनवृद्धी डोळ्यासमोर ठेवून ‘इतिहासातून समृद्धीकडे’, असा संदेश देणारे हे बोधचिन्ह विजयदुर्ग अष्टशताब्दी महोत्सवाचे प्रणेते राजीव परुळेकर यांनी तयार केले आहे.
या कार्यक्रमावेळी श्री. परुळेकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किल्ले संवर्धन आणि पर्यटन विकास साधण्याचे आवाहन करताना मोठ्या प्रमाणात स्थानिकांमध्ये पर्यटन रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. सुनील बासरानी, आसमाचे खजिनदार राजाराम शिंदे, माजी सरपंच प्रसाद देवधर, प्रभारी सरपंच काझी यांनी मनोगत व्यक्त केले. आसमाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात ऐतिहासिक विजयदुर्ग हे राज्यातील मोठे पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या पर्यटन स्वागत कार्यालयाच्या इमारतीसाठी कोल्हापूर मुद्रण संघाचे अध्यक्ष तथा आसमाचे माजी उपाध्यक्ष संजय थोरवत यांनी ११ हजार रुपये, आसमाचे अध्यक्ष बासरानी यांनी ५ हजारांची रोख मदत दिली. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या शुभा कदम, पूर्वा लोंबर, दिनेश जावकर, वैशाली बांदकर-कीर, सिध्देश डोंगरे, प्रतीक्षा मिठबावकर, माजी उपसरपंच महेश बिडये, प्रदीप साखरकर, मंगेश वेतकर, सुरेश वेलणकर, शरद डोंगरे, विजय तांबे, जितेंद्र बिर्जे आदी उपस्थित होते.