डी.एड्.धारकांसाठी प्रसंगी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी.एड्.धारकांसाठी प्रसंगी आंदोलन
डी.एड्.धारकांसाठी प्रसंगी आंदोलन

डी.एड्.धारकांसाठी प्रसंगी आंदोलन

sakal_logo
By

८६०७०

डी.एड्.धारकांसाठी प्रसंगी आंदोलन
युवा सेनेचा इशारा; शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच स्थानिक डी.एड, डी.टी.एड उमेदवारांना नियुक्ती मिळावी, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची केली आहे. स्थानिकांना न्याय न दिल्यास युवासेना खंबीरपणे प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी प्रशासनास दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे ५७६ च्यावर पदे रिक्त असल्याचे समजते. सद्यस्थितीत एकट्या सिंधुदुर्गात बदली होऊन जाणाऱ्यांना कार्यमुक्त केल्यास हीच संख्या १००० च्या वर निश्चित जाईल. या पदांवर बदली करून जाण्यास तयारीत असणाऱ्यांना कार्यमुक्त करून सर्व रिक्त पदांचा पुन्हा आढावा घेत स्थानिक डी.एड्. बेरोजगारांना सामावून घ्यावे. कारण गेली दहा वर्षे भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याने अनेक डी.एड्. धारक देशोधडीला लागले आहेत. काहींची नोकरीची आयुमर्यादा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भरतीसाठी असणारी वयोमर्यादा वाढविणे गरजेचे आहे. स्थानिक डी.एड धारकांची भरती करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. सरसकट सर्व डी.एड्. पदविकाधारकांना टीईटी उत्तीर्णचे निकष शिथिल करून सरळ अभियोग्यता चाचणी (TAIT) परीक्षेस बसण्याची संधी द्यावी आणि अभियोग्यता परीक्षा (TAIT) मेरिटवर सेवेत जे रुजू होतील, त्या दिवसापासून पाच वर्षांच्या मुदतीत पात्र होण्यासाठी आवश्यक असणारी (TET) परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी द्यावी. मुदतीत उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून मग कमी करावे. भरती ही बोलीभाषा, डोंगरी भाग, स्थानिक बोलीभाषा ससंवर्धन, बदलीमुळे होणारी रिक्त पदे टाळण्यासाठी विभागीय भरती प्रक्रिया राबिण्यात यावी. एमपीएससी (MPSC) प्रमाणे विभागवार मेरिट लिस्ट लावून स्थानिकांना किमान ७० टक्के पदे राखीव ठेऊन भरती व्हावी. कोकणवासीयांवर होणारा अन्याय लक्षात घेऊन स्वतंत्र कोकण विभागाच्या भरतीसाठी वेगळा शासन निर्णय वेळीच घ्यावा. दहा वर्षे न झालेली भरती आणि दोन वर्षांचा कोरोना काळ यामुळे वयोमर्यादा ओलांडून कित्येक उमेदवार बाद ठरतील. त्यांना संधी मिळावी म्हणून भरतीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी, आदी मागणी डी.एड्. आणि डीटीएड उमेदवारांच्या वतीने युवासेनेमार्फत धुरी यांनी केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून स्थानिकांना न्याय द्यावा; अन्यथा युवासेना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहून प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही धुरी यांनी दिला आहे.