शिक्षक बदली 21 पर्यत लांबवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बदली 21 पर्यत लांबवली
शिक्षक बदली 21 पर्यत लांबवली

शिक्षक बदली 21 पर्यत लांबवली

sakal_logo
By

शिक्षक बदली २१ पर्यत लांबवली
प्रक्रियेत बदलः आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांच्या कार्यमुक्तीस परवानगी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षक बदलीची सुरू असलेली प्रक्रिया सहाव्या टप्प्यात अडकली होती. अवघड क्षेत्र बदली प्रक्रियेला शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया थांबली होती. अखेर शासनाने याबाबत बदल करीत २१ मार्चपर्यंत प्रक्रिया लांबविली आहे. संवर्ग १ मधील अनावधानाने बदली मागण्याचे राहिलेल्या शिक्षकांना सुध्दा यात पुन्हा बदली मागण्याची संधी दिली आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना ३० एप्रिलपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ४६० शिक्षकांचा आपल्या जिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राथमिक शिक्षकांचा जिल्हातर्गत बदली प्रक्रियेचा वेळापत्रकात बदल केला असून आता ही प्रक्रिया २१ मार्चपर्यंत राबविली जाणार आहे. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर संवर्ग १ मधील शिक्षकांना होकार किंवा नकार देण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांना पसंतीक्रम भरण्यासाठीही संधी दिली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हातंर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया शासनाने डिसेंबर २०२२ पासून हाती घेतली आहे. एकूण सहा पैकी पाच टप्प्यातील बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या शेवटचा टप्प्यावरील प्रक्रिया सुरू आहे. ही बदली प्रक्रिया राबवित असताना सेवा ज्येष्ठता तसेच संवर्ग १ मधील शिक्षकांचा समावेश या बदली यादीमध्ये झाला आहे. संपूर्ण राज्यभरात ही परिस्थिती उद्भवल्याने प्राथमिक शिक्षकांचा विविध संघटनानी या टप्प्यातील त्रुटींकडे शासनचे लक्ष वेधले होते.
विशेष संवर्ग १ शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे. मात्र, बदली प्रक्रिया राबविताना यामधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याबाबत पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्यात समाविष्ट झालेले आहेत. संवर्ग १ मधील ज्या शिक्षकांची सेवा विद्यमान शाळेत तीन वर्षापेक्षा कमी झालेली आहे. अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणेबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचीत ठरणार नाही, असे शिक्षक संघटनानी शासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. याची दखल घेत शासनाने शिल्लक बदली टप्यासाठी सुधारीत वेळापत्रक जाहिर केले आहे. यानुसार ६ ते ८ मार्च कालावधीत विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांनी बदलीसाठी होकार-नकार भरणे, ९ ते ११ मार्च शिक्षणाधिकारी यांनी अर्जाची पडताळणी करणे, १३ मार्च अवघड क्षेत्रातील रीक्त पदाची यादी सीईओ यांनी प्रसिद्ध करणे. १४ ते १७ मार्च शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील रीक्त जागाचे पर्याय भरणे. १८ ते २० मार्च अवघड क्षेत्रातील रीक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सॉफ्टवेअरद्वारे बदली प्रक्रिया राबविणे. २१ मार्चला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून अंतिम बदली आदेश प्रकाशित केले जाणार आहेत.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने २०१७ पासून ऑनलाईन बदली धोरण अवलंबिले आहे. २०२२ पर्यंत एकूण पाच टप्प्यात या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्हातील ३३८, दुसऱ्या टप्प्यात शून्य, तिसऱ्या टप्प्यात ७६, चौथ्या टप्प्यात ५ आणि पाचव्या टप्प्यात ३६६ अशा एकूण ७८५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरजिल्हा बदली झाली असली तरी जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदांच्या प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असल्याने या बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त केले नव्हते. ७८५ पैकी ३०८ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. यात पहिल्या टप्प्यातील ३०३ तर दुसऱ्या टप्प्यातील ५ शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित ४७७ शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. यातील १७ शिक्षकांनी कार्यमुक्त करण्यात येवू नये, अशी लेखी मागणी केली आहे. त्यामुळे ३६० शिक्षक स्वतःच्या जिल्ह्यात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या सर्व शिक्षकांना ३१ मे २०२३ पर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. मात्र त्यात आता बदल केला असून ३० एप्रिल २०२३ पर्यंत कार्यमुक्तची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र, हे आदेश देताना शासनाने रिक्त पदांची टक्केवारी १० टक्के असल्यास सोडू नये, याबाबत काहीच नमूद केलेले नाही. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या सर्व ४६० शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचाली शिक्षण प्रशासनात सुरू झाल्या आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवून ४६० शिक्षकांना मुक्त केल्यास जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या ११११ होणार आहे. तसेच रिक्त पदांची टक्केवारी ३४ टक्के होणार आहे. उपशिक्षक व पदवीधर मिळून मंजूर ३८९३ शिक्षक पदांपैकी ३२४२ पदे भरलेली आहेत. यातील ४६० शिक्षक कार्यमुक्त झाल्यास नवीन शैक्षणिक वर्षात कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार आहे.