
अहमदनगर अभ्यास दौऱ्यासाठी अधिकारी, पदाधिकारी रवाना
८६१६८
नगर अभ्यास दौऱ्यासाठी
अधिकारी, पदाधिकारी रवाना
५५ जणांचा सहभाग; ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत नियोजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत नगर, पुणे येथे चार दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आज सिंधुदुर्गनगरी येथून रवाना झाले. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत आयोजित या दौऱ्यात अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य असे ५५ जण सहभागी झाले आहेत. या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली.
जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडून नव्याने सरपंच, उपसरपंचांनी कार्यभार हाती घेतला. त्यांच्याकडून आदर्शवत काम व्हावे, यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने सरपंच, उपसरपंच, सदस्य व अधिकाऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. दौऱ्यात सहभागी झालेले सरपंच, उपसरपंच, सदस्य आज सायंकाळी बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे मुक्काम, उद्या (ता. २) बारामती पंचायत समिती कृषी विज्ञान केंद्र, ग्रामपंचायत राळेगण सिद्धी, ग्रामपंचायत हिवरे बाजार (ता. नगर) येथे भेट, त्यानंतर शिर्डी येथे मुक्काम, शुक्रवारी राहता पंचायत समितीला भेट, लोणी ग्रामपंचायत तालुका राहता तसेच जुन्नर तालुक्यातील टिक्केकरवाडी ग्रामपंचायत आणि शाळा भेट, रात्री पुणे येथे मुक्काम, शनिवारी (ता. ४) ग्रामपंचायत मान (ता. मुळशी, जि. पुणे) येथे भेट, सातारा जिल्ह्यातील भिल्लार या पुस्तकांच्या गावाला भेट, महाबळेश्वर नगरपरिषद भेट, त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दौऱ्यात २५ पदाधिकारी, ३० अधिकारी, कर्मचारी असा ५५ जणांचा समावेश आहे.