
पान एक-मळगावात अपघातानंतर तणाव
86258
मळगाव ः येथील बुधवारी झालेल्या अपघातावेळी पर्यटक व स्थानिकांत तणाव निर्माण झाला होता.
86259
मळगाव ः अपघातस्थळी स्थानिकांनी झालेली गर्दी.
मळगावात अपघातानंतर तणाव
जमाव संतप्त; दंगल काबू पथक पाचारण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः मोटार आणि सहा आसनी रिक्षा अपघातानंतर झालेल्या मारहाणीमुळे मळगावात आज दुपारी जनक्षोभ उसळला. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले. गोवा येथून पुण्याच्या दिशेने जाणारी आलिशान मोटार आणि सहा आसनी रिक्षात अपघात झाला. त्यानंतर गाडीतील पर्यटकांनी रिक्षाचालकास मारहाण केली. पोलिस संरक्षणात संबंधित पर्यटकांना ठाण्यात आणले; मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी ः सावंतवाडी-रेडी मार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासच्या मुख्य बॉक्सेललगत दोन्ही वाहनांत अपघात झाला. यानंतर मोटारीमधील पर्यटकांनी सहाआसनी रिक्षाचालकाला मारहाण केली. त्याला गाडीत टाकून नेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार पाहून त्याला सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनाही त्या पर्यटकांनी मारहाण केली. यानंतर काही क्षणातच तेथे स्थानिकांचा जमाव वाढला. त्यांनी गाडी रोखत संबंधितांना जाब विचारला. त्यातून वाद वाढला आणि जमाव अधिकच संतप्त झाला. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त जमावाने संबंधितांनी जाहीर माफी मागावी व रिक्षाचालकाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे घटनास्थळी दाखल झाले.
जमाव वाढल्यामुळे तणावातही वाढ झाली. त्यामुळे पोलिसांनी दंगा काबू पथक पाचारण केले. मेंगडे यांनी स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त जमाव त्यांच्या भूमिकेवर ठाम होता. अखेर संबंधित पर्यटकांना बंदोबस्तात सावंतवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. माजगाव, मळगाव, तळवडे, वेत्ये व पंचक्रोशीतील ग्रामस्थही पाठोपाठ ठाण्यात आले. संबंधितावर मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांची होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकारीही मोठ्या संख्येने तेथे आले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्या परब, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ॲड. सचिन गावडे, माजगावचे माजी सरपंच दिनेश सावंत, माजी उपसभापती चद्रकांत कासार, भाजपचे युवा मोर्चा चिटणीस अजय सावंत, दशरथ मल्हार, भूषण पेडणेकर यांसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. रिक्षा
वाद सोडविणाऱ्यांनाही धक्काबुक्की
अपघातानंतर त्या ठिकाणी पर्यटकांनी संबंधित रिक्षाचालकास मारण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही प्रवाशांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमा झाले व तणाव निर्माण झाला. त्यावेळीही पर्यटक आणि ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की झाली.