निरवडे गावाच्या यशात सर्वांचे योगदान

निरवडे गावाच्या यशात सर्वांचे योगदान

Published on

swt२५.jpg
८६३५०
निरवडेः कोकण उपायुक्त गिरीश भालेराव यांचा सत्कार करताना सरपंच सुहानी गावडे. बाजूला चंद्रशेखर जगताप आदी.

निरवडे गावाच्या यशात सर्वांचे योगदान
गिरीश भालेरावः विभागीय समितीकडून ग्रामपंचायतीचे मूल्यांकन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः निरवडे ग्रामपंचायतीच्या सरंपच सुहानी गावडे क्रियाशील नेत्या असून विकासाचा पायंडा असाच पुढे सुरू ठेवावा, असे गौरवोद्गार कोकण विभागाचे उपायुक्त गिरीश भालेराव यांनी आज येथे काढले. निरवडेत झालेली समृध्दी हे ग्रामस्थांच्या एकीचे फलित असून या गावास कोकणातील ‘राळेगणसिध्दी’ अशी उपाधी दिल्यास अतिशयोक्ती ठरू नये. या ग्रामपंचायतीचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यानंतर कोकण विभागासाठी निवड करण्यात आली. याबाबतचे मूल्यांकन करण्यासाठी आज विभागीय कोकण उपायुक्तांचे चार सदस्यीय समिती गावामध्ये दाखल झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. भालेराव बोलत होते. उपविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, विभागीय समन्वयक पूजा साळगावकर, विभागीय आयुक्त विठ्ठल लांबोर, उपायुक्त विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, जयराम जाधव, धर्माजी गावडे, अंगारिका गावडे, रेश्मा पांढरे, प्रगती शेटकर, आनंदी पवार, माजी सरपंच प्रमोद गावडे, माजी सरपंच हरी वारंग, ग्रामविकास अधिकारी सुनीता कदम, निवृत्त ग्रामविकास अधिकारी मधुकर घाडी आदी उपस्थित होते.
श्री. भालेराव पुढे म्हणाले, ‘‘निरवडे ग्रामपंचायतचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. गावाला २००८ पासून पुरस्कार मिळण्यास सुरुवात झाली. ही यशोमालिका अविरतपणे सुरू केलेला असून त्याबद्दल सरपंच, माजी सरपंच, सदस्य आणि गावातील लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी असलेल्या महिला बचतगटांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करणे गरजेचे आहे. शेतीपूरक व्यवसाय केल्यास उत्पन्नात वाढ होऊन आपण आर्थिक सक्षम बनू शकतो. आर्थिक बाजू सक्षम असल्यास समाजात स्थान मिळते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामस्थाने सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत राहावे. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही निश्चितच करू.’’
सरपंच गावडे म्हणाल्या, ‘‘निरवडे ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यासाठी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि गावातील ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. गावात स्वच्छता राहण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित असते. येथील ग्रामस्थ स्वच्छतेसाठी स्वतःहून पुढाकार घेतात, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. यापुढे सुद्धा निरवडे गावाला विविध पुरस्कार मिळण्याच्या दृष्टीने माझ्यासह सर्व सदस्य काम करणार आहोत. ग्रामस्थांनी पुढे येऊन या कार्यात सहकार्य केल्यास गाव विविध यशोशिखरे नक्कीच पार करेल.’’
श्री. वारंग म्हणाले, " मी सरपंच असताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील शाळांना रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर आम्ही प्रत्येक शाळा डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील शालेय मुले विविध उपक्रम राबवितात, पाहून समाधान वाटते. गावात शेतकरी मेळाव्यासह विविध उपक्रम राबविले. त्याला येथील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला. सावंतवाडी तालुक्यात ६३ हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये निरवडेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळणे हे सर्वांचेच यश आहे."
यावेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ हेल्थ सेंटर, गांडूळ खत प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय प्रकल्प, प्राथमिक आरोग्य केंद्र, शोषखड्डे आणि ग्रामस्थांच्या घर परिसराची स्वच्छता याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com