
सिंधुदुर्गातील काही धरण कामांची स्थगिती सरकारने उठवली
kan26.jpg
86370
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत बोलताना बिग्रेडियर सुधीर सावंत, बाजूला महिंद्र सावंत, भूषण परुळेकर
--------------
सिंधुदुर्गातील काही धरण कामांची स्थगिती सरकारने उठवली
ब्रिगेडियर सुधीर सावंत : सिंधुदुर्गातील इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच बैठक
कणकवली, ता. २ : जिल्ह्यातील गांधीनगर, नावळे, दिंडवणे यांसह इतर काही धरणांना सरकारने स्थगिती दिली होती. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून ही स्थगिती उठविण्याची विनंती केली. त्यानंतर तातडीने धरण कामांवरील स्थगिती उठविण्यात आली अशी माहिती निवृत्त बिग्रेडिअर सुधीर सावंत यांनी दिली. तर जिल्ह्यातील इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
येथील शिवसेना कार्यालयात श्री. सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख एम. एम. सावंत, कलमठ शहराध्यक्ष प्रशांत वनस्कर, भास्कर राणे उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, धरणकामे लवकरात लवकर पूर्ण झाली तर मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढणार आहे. तर धरणकामांना जेवढा वेळ लागेल तेवढी किंमत वाढणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील धरण प्रकल्पाची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी आमची आग्रही भूमिका आहे. कुडाळ येथील आकरीपड प्रश्न प्रलंबित आहे. मच्छिमार लोकांचा आजही प्रश्न कायम आहेत. पर्ससीन नेट नौकांच्या आक्रमणामुळे पारंपरिक मच्छीमार हतबल झाले आहेत. पर्ससीन नौका समुद्रातील सर्व प्रकारचे मत्स्यबीज नष्ट करत आहेत. या प्रश्नावर तातडीने मार्ग निघावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.
सिंधुदुर्गात पर्यटन वाढण्यासाठी न्याहारी निवास यांची संख्या वाढायला हवी. जास्तीत जास्त पंचतारांकित हॉटेल्स सुरू व्हायला हवीत. प्रत्येक गावात जेटी झाली पाहिजे. आंबा, काजू या पिकांवर अतिप्रमाणात कीटनाशके वापरण्यात आली. वारेमाप रासायनिक खते देण्यात आली. त्यामुळे आता आंबा, काजू बागायतदार अडचणीत आले आहेत. यावर आम्ही नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीचा विकल्प आणला आहे. हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यासाठीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी आमची चर्चा सुरू असल्याचे श्री.सावंत म्हणाले.