
चिपळूण ः थकित करदात्यांची नावे झळकणार फलकावर
थकीत करदात्यांची नावे
झळकणार फलकावर
चिपळूण पालिका; ८७ जणांचा पाणीपुरवठा बंद
चिपळूण, ता. २ ः मालमत्ता तसेच शासकीय कर व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी चिपळूण पालिकेने आक्रमक धोरण अवलंबले आहे. तीन पथकांद्वारे पाणीपट्टी तर दहा पथके मालमत्ता कराच्या वसुलीत गुंतली आहेत. आतापर्यंत थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या २७ मालमत्तांवर जप्तीची, तर ८७ जणांवर नळजोडणी तोडण्याची कारवाई केली. जे थकबाकीदार कराची रक्कम भरणार नाहीत त्यांच्या नावाचे फलक शहरात लावले जाणार असून, वृत्तपत्रांमध्येही त्यांची नावे जाहीर केली जाणार आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने वसुलीची धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे.
ही कारवाई ७ मार्चपासून केली जाणार असून, तशा नोटीस संबंधितांना धाडण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा वेग आणखी वाढवला आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेल्या अनेकांच्या मालमत्ता जप्त केल्या असून, ८७ जणांची नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यातील ४२ जणांनी कर भरल्याने त्यांचा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे; तर जे कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांची नळजोडणी तोडली जात आहेत. पाणीपट्टीतून पालिकेला २ कोटी ५० लाख रु. अपेक्षित असून, त्यातील केवळ ९७ लाख रुपये वसूल झाले आहेत, तर अजूनही १ कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी येणे बाकी आहे. त्यामुळे कनेक्शन तोडण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
घरपट्टी व इतर शासकीय करासह थकबाकीची सुमारे १६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आजपर्यंत ८ कोटी ५० लाख वसूल झाले असून, सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये येणे बाकी आहेत. यामध्ये न्यायालयीन २ प्रकरणांचे १ कोटी ५ लाख रुपयांचा समावेश आहे. आतापर्यंत २७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यापैकी ८ जणांनी पूर्ण, तर तीन जणांनी अर्धी रक्कम भरली आहे. त्यामुळे त्यांची जप्ती मागे घेण्यात आली. या मालमत्ता थकीत करापोटी ३० लाख रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांची नावे वृत्तपत्र तसेच शहरात फलकांद्वारे प्रसिद्ध केली जाणार असल्याने ती कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी धडपड सुरू केली आहे.
---------
कोट
शहरातील ज्या नागरिकांचा कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे त्यांच्याकडे गेल्या चार महिन्यांपासूनच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी वसुलीसाठी पाठपुरावा करत आहेत. थकीत कर भरण्यासाठी त्यांना सूचना देत कालावधीही देण्यात आला. अनेकांवर जप्तीची कारवाईदेखील झाली आहे. यापुढे जे थकीत कर भरणार नाहीत, त्यांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.
- बाळकृष्ण पाटील, उपमुख्याधिकारी