हर्णै-दापोली-हर्णै-आंजर्ले मार्गावर वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-दापोली-हर्णै-आंजर्ले मार्गावर वाहतूककोंडी
हर्णै-दापोली-हर्णै-आंजर्ले मार्गावर वाहतूककोंडी

हर्णै-दापोली-हर्णै-आंजर्ले मार्गावर वाहतूककोंडी

sakal_logo
By

rat३p८.jpg
86597
हर्णैः येथील बाजारपेठेत होत असलेली वाहतूक कोंडी होत असल्याने पर्यटक नाराज होतात.
-------------
वाहतूक कोंडीने पर्यटक हैराण
दापोली-हर्णै मार्गावर होमगार्डची नियुक्ती; अरुंद रस्त्यामुळे उपाययोजना तोकड्या
दाभोळ, ता. ३ ः दापोली-हर्णै मार्गावरील हर्णै बाजारपेठ येथे कायमच वाहतूककोंडी होत असल्याने त्याचा त्रास वाहनचालक व पर्यटकांना होत आहे. दापोली-हर्णै-आंजर्ले मार्गावरील हर्णै येथे बाजारपेठेत सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येत असून, हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांना बाजू देण्यासाठी पुरेसा मार्ग नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ती होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने होमगार्डची नियुक्ती केली आहे; मात्र मोठ्या संख्येने वाहने येत असल्याने त्यांनाही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मर्यादा येतात.
दापोली तालुक्यातील हर्णै बंदर हे मच्छीमारीसाठी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर आहे. त्याचप्रमाणे हर्णै ही मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. हर्णै पाजपंढरी हे एकमेकांना लागून असलेले गावे आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या २० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हर्णै बाजारपेठेत या ना त्या कामानिमित्ताने कायमच लोकांची आणि या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची गर्दी असते. त्यात हर्णै बंदरावर सकाळ-संध्याकाळ दोनवेळा मासळीचा लिलाव होत असल्याने व्यापारी मोठ्या संख्येने येथे येत असतात. तसे मासळी खरेदी करणाऱ्यांचीसुद्धा काही कमी नसते. त्यातच हर्णै येथील समुद्रातील पाण्यात सुर्वणदुर्ग किल्ला असल्याने तसेच गोवा किल्ला (भुईकोट), फत्तेगड, कनकदुर्ग, दीपगृह आदी गडकिल्ले असल्याने या ठिकाणी पर्यटक कायम येतच असतात. ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी शासनाने समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.