
गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवू
86830
मुंबई ः स्वतंत्र गड-दुर्ग महामंडळाची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन दिले.
गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवू
पर्यटनमंत्री लोढा; मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण’ महामोर्चाची सांगता
कुडाळ, ता. ४ ः महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र गड-दुर्ग महामंडळाची स्थापना येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल. ठराविक कालमर्यादा ठरवून सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील. तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ठोस आश्वासने राज्याचे पर्यटन, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गड-दुर्ग रक्षण महामोर्चाच्या सांगता प्रसंगी दिल्याची माहिती महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.
महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीतर्फे मुंबईत गड-दुर्ग रक्षण महामोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री लोढा यांनी आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. गड-दुर्ग रक्षण महामोर्चात राज्यभरातून गड-दुर्गप्रेमी संघटनांचे १५०० हून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते. मुखात छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवे झेंडे अन् मागण्यांचे फलक यांसह तुतारी अणि मावळ्यांची वेशभूषा करत दुर्गप्रेमी उत्साहात या महामोर्च्यात सहभागी झाले आणि गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा काढण्यात आलेल्या मोर्चात नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील आणि सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज विश्वजित देशपांडे, कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदराव काशिद, पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकील या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचा सहभाग लक्षवेधी होता. तसेच समस्त हिंदू बांधव संघटनेचे रवींद्र पडवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक तथा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, वसई येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव बी. पी. सचिनवाला, श्रीमज्जगद्गुरू शंकराचार्य पिठाच्या धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक संत सद्गुरू अनुराधा वाडेकर या मोर्चात उपस्थित होते, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. शासनाने गड-दुर्ग संवर्धनासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. गडांची नियमित स्वच्छता आणि पावित्र्यरक्षण यासाठी गड-दुर्गप्रेमी संघटनांचे साहाय्य घ्यावे. पुरातत्त्व खात्याने सर्व गड-दुर्गांची योग्य माहिती आणि कायदेशीर बाबी सांगणारे संकेतस्थळ सुरू करून त्यात नागरिकांना तक्रार करण्याची सोय असावी. गड-दुर्ग रक्षणासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या महामंडळात गड-दुर्ग संवर्धनासाठी कार्य करणारे प्रतिनिधी, मावळ्यांचे वंशज, गड परिसरातील दुर्गप्रेमी-शिवप्रेमींना सहभागी करावे, आदी मागण्या यावेळी केल्याची माहिती घनवट यांनी दिली.
................
चौकट
विविध संघटनांचा महामोर्चात सहभाग
मोर्चामध्ये समस्त हिंदू बांधव संघटना, शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरियर्स, गड-दुर्ग संवर्धक संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती, रणरागिणी (महिला शाखा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदू धर्मजागरण, सनातन संस्था, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी १०० हून अधिक गड-दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.