
समाजकंटकांवर कारवाई आवश्यक
86824
सावंतवाडी : ‘कोमसाप’च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. (छायाचित्र ःरुपेश हिराप)
समाजकंटकांवर कारवाई आवश्यक
‘कोमसाप’; केशवसुत स्मारकाचा अवमान खेदजनक
सावंतवाडी, ता. ४ ः सोशल मीडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान झाला असून हा प्रकार साहित्यिकांसह सावंतवाडीकरांच्या भावनांना ठेच पोहोचवणारा आहे. या घटनेचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्यावतीने निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिक्षकीपेशा असणाऱ्या कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचे शहरात माठेवाडा येथे वास्तव्य होते. यावेळी मोती तलाव काठावर ''संध्याकाळ'' या कवितेचे लेखन त्यांनी केले होते. त्यांच्या स्मरणार्थ मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या केशवसुत कट्ट्यावर त्यांच्या काही अजरामर कविता पाहायला मिळतात. त्यांच्या ‘तुतारी’ कवितेचे प्रतीक असणारे ‘तुतारी स्मारक'' या ठिकाणी उभारले आहे. गेले दोन दिवस एका अज्ञात व्यक्तीचा स्मारकाच्या ठिकाणी असणारी तुतारी फुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती व्यक्ती स्मारकावर उभी राहून तुतारी फुंकण्याचा अभिनय करत आहे. हा व्हिडिओ ‘एडिट’ करून त्याला तुतारीचा आवाज जोडून सोशल मीडियावर व्हायरल केला. ट्रेडिंगच्या नावाखाली स्मारकाचा अवमान संबंधित व्यक्तीने केला आहे. या घटनेचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या वतीने तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, याप्रसंगी कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जिल्हा सदस्य भरत गावडे, अॅड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, विनायक गांवस आदी उपस्थित होते.
--
कोट
ही घटना निषेधार्ह असून याबाबत पोलिसांना पालिकेतर्फे कारवाईची विनंती करणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सूचना फलक लावू
- जयंत जावडेकर, मुख्याधिकारी
---
कोट
या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित व्यक्ती व व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांचा सायबर क्राईमच्या माध्यमातून शोध घेऊन कारवाई करू. व्हायरल व्हिडिओ व कोमसापने केलेली मागणी सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करत संबंधितांवर कडक कारवाई करू.
- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक