
सिंधुदुर्ग जिल्हा शिमगोत्सवासाठी सज्ज
सिंधुदुर्ग जिल्हा शिमगोत्सवासाठी सज्ज
११७१ ठिकाणी होळी; वाद असलेल्या गावात निर्बंध
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः जिल्ह्यात सोमवारपासून (ता. ६) सुरू होणाऱ्या शिमगोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक, तर ६३३ खासगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळींचे पूजन होणार आहे. काही गावांत मानपानावरून वाद असल्याने तेथे पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, शिमगोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात शिमगोत्सव महत्त्वाचा सण मानला जातो. याला गणेशोत्सवानंतर सर्वाधिक महत्त्व दिले जाते. यासाठी चाकरमानीही मोठ्या संख्येने येतात. प्रत्येक गावात शिमगोत्सवाच्या प्रथा परंपरा, उत्सवाचे दिवस वेगवेगळे असतात. याची सुरुवात होळी उभारून होते. यावर्षीचा होळी उत्सव सोमवारपासून सुरू होत असून काही गावात पाच दिवस, सात दिवस, तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी जिल्ह्यात ५३८ ठिकाणी सार्वजनिक तर ६३३ ठिकाणी खासगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळीचे सालाबादप्रमाणे पूजन केले जाणार आहे. काही गावात मानपानावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने बंदी घातली आहे. ज्या गावात वाद आहेत, अशा गावांत वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. हा उत्सव उत्साही वातावरणात साजरा व्हावा, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे. निर्बंध असलेल्या गावांत वाद मिटून उत्सव साजरा होण्यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी सिंधुदुर्गात होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होऊ लागले असून यावर्षीचा होळी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सिंधुदुर्गात गावागावातील रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषांतील नाचगाण्यांचे वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने होळी उत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
---
सार्वजनिक होळीचे होणार पूजन
जिल्ह्यात सार्वजनिक होळ्यांमध्ये दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५२, बांदा २६, सावंतवाडी ४०, वेंगुर्ले २७, निवती १२, कुडाळ ९१, सिंधुदुर्गनगरी ९, मालवण ५९, आचरा २१, कणकवली ६७, देवगड ६७, विजयदुर्ग २५, वैभववाडी ३८ अशा ५३८ ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन होणार आहे.