
ईएसआयसी
86873
...
‘ईएसआयसी’ने कामगारांना चांगल्या सेवा द्याव्यात
खासदार संजय मंडलिकः सहा जिल्ह्यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घघाटन
कोल्हापूर, ता. ४ ः ‘ कामगार हे कुटूंबातील घटक आहेत, अशा धारणेने उद्योजक त्यांची काळजी घेतात. साधनसामुग्री देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत होत आहे. त्या आधारे ईएसआयसी प्रशासनाने या कामगारांना आरोग्याच्या चांगल्या सेवा द्याव्यात,’ अशी अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.
ईएसआयसीच्या सहा जिल्ह्यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे आज येथील ताराबाई पार्कातील क्रिस्टल प्लाझात उद्घघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, विश्वविजय खानविलकर उपस्थित होते. या प्रशासकीय कार्यालयामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यातील तीन लाख कामगारांचा लाभ होणार आहे. ईएसआयसीच्या विमाधारक कामगारांना त्यांच्या उपचाराची बिले, रजा कालावधीतील वेतनासंबधीचे कामकाज येथे होईल.
खासदार मंडलिक म्हणाले , ‘गेल्या काही वर्षांपूर्वी ईएसआय इमारतीची भयावह स्थिती होती. ती बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे माझ्यासह तिन्ही खासदारांनी पाठपुरावा केला. त्यानंतर एक समिती नियुक्ती झाली. या समितीने अभ्यास करून येथे कामगारांच्या आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले. हे रूग्णालय अधिक दर्जेदार करून येथे औषधोपचार, शस्त्रक्रियांपासून ते रक्तपेढी पर्यंतच्या सुविधा करण्यासाठी तयारी सुरू झाली. त्याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना होईल.’
खासदार धैर्यशील माने म्हणाले , ‘नवीन कार्यालयामुळे दीड लाख कामगारांची सोय झाली आहे. कामगारांचे विमा दावे पूर्ण करण्यास विलंब होऊ नये.’ ईएसआयचे समन्वयक विज्ञानंद मुंढे म्हणाले, ‘ कोल्हापूरची ईएसआयसी रूग्णसेवा देशातील रोल मॉडेल ठरावी. उत्तम दर्जाच्या सेवा येथे उपलब्ध झाल्याने कामगारांना परतव्याची रक्कम जलद गतीने खात्यावर जमा व्हावी.’ जॉन डिसुझा यांनी आभार मानले.
...
ईएसआयसी रूग्णालय सेवेचा विस्तार
ईएसआयसी सोसायटीचे राज्य संचालक महेश वरूडकर म्हणाले , ‘खासदार मंडलिक यांच्या प्रयत्नामुळे १४८ दवाखाने मंजूर झाले आहेत. त्यातील ८५ दवाखाने सुरू झालेत. पुढील वर्षात आणखी ६३ दवाखाने सुरू होतील. येथील उद्योजक व कामगारांकडून राज्यात सर्वात जास्त वर्गणी ईएसआयसी कार्पोरेशनला जाते. त्यामुळे येथे अधिक चांगल्या सुविधा देण्यात येतील. सिटीस्कॅन सुविधा लवकरच सुरू होईल.’