
सदर ः मुलाचे सामाजिकीकरण ः काळाची गरज
२७ फेब्रुवारीच्या टुडे पान ३ वरून लोगो व लेखक फोटो घेणे..
लोकल टू ग्लोबल ................लोगो
rat५p१.jpg ः गजानन पाटील
इंट्रो
मुलाच्या सामाजिकीकरणाला खरी सुरवात शाळेत होते असं म्हणतात. मूल घरात आपले आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भावंड यांच्यासोबत शिकत असतं; पण जेव्हा घरचा उंबरठा ओलांडून ते शाळेत प्रवेश करते तेव्हा त्याच्या समवयस्क मित्रांशी त्याचा पहिला संवाद होतो. त्यानंतर शिक्षक, आजूबाजूचा परिसर, लोक, इतर मुलांचे पालक यांच्याशी त्याचा संबंध येतो. त्यातूनच त्याच्या सामाजिकीकरणाला खरी सुरवात होते. शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे, असे म्हणतात ते याच अर्थाने. मुलाला समाजात कसं वागावं, कसं बोलावं, समाजातील वडीलधाऱ्या मंडळींशी कसा संवाद करावा, समाजातील गोरगरीब, अनाथ लोकांची दुःख कसं समजून घ्यायचं हे सगळं शाळेत शिकवलं जातं. वेगवेगळ्या धड्यांच्या माध्यमातून मुलांवर सामाजिक संस्कार केले जातात. हे जरी सत्य असलं तरी आज हायफाय इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये या सामाजिकीकरणाचा अभाव दिसून येतो. मुलाला फक्त घर, शाळा, अभ्यास आणि त्याचा वर्ग एवढंच त्याचं मर्यादित जग राहतं. त्यामुळे समाजाशी देणंघेणं फारसं उरत नाही. आई-वडिलांना सवड नसल्यामुळे तेही मुलाला समाजाशी आपलं नातं सांगू शकत नाहीत. या सगळ्याचा परिणाम म्हणून मूल सामाजिकीकरणापासून दूर जाते.
- डॉ. गजानन पाटील
--------------
मुलाचे सामाजिकीकरण ः काळाची गरज
मुलाच्या सामाजिकीकरणाचा अभाव शाळेमधून दिसून आल्याने यवतमाळ डाएटमध्ये असताना मुलाची सामाजिकीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने व्हावी, त्याने समाजाशी समरूप व्हावं, समाजातील वंचित, दुःखी घटकांची दुःख जाणून घ्यावीत यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम डाएटमध्ये केली. विशेषकरून सराव पाठशाळेतील आणि डीएडच्या मुलांकरिता हे उपक्रम राबवले गेले. यामध्ये आसपासच्या वृद्धाश्रमांना भेट देऊन तिथल्या वृद्धांशी संवाद साधून त्यांची दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांची सेवा करणे, काही आदिवासी वाड्या-वस्तीतील लोकांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांची दुःख जाणून घेणे. तेव्हा आदिवासी वाड्यावस्तीमध्ये लोकं कसे राहतात? त्यांची दुःख कशी वेगळी आहेत हे समजून आलं. तलावाच्या काठी मासेमारी करणाऱ्या कुटुंबांना भेट देऊन त्यांचा जीवनक्रम समजून घेणे. यातून पोट भरण्यासाठी लोकांना काय करावं लागते हे मुलांना समजून आले. रस्त्यावर बसून रानटी फळं, भाज्या विकणाऱ्या मंडळींना भेटणे, भाजीपाला मार्केटमध्ये भाजी विकणाऱ्या मंडळींशी संवाद साधणे, दुकानदार, पोस्ट कार्यालय, रेल्वेस्टेशन यांना भेट देणे असे उपक्रम राबवले.
या सगळ्यातून विद्यार्थी एक गोष्ट शिकले ते म्हणजे आपली शाळा. हे काही जग नाही तर शाळेच्या बाहेर मोठे जग आहे. त्या जगाचा आपल्याला अभ्यास पाहिजे. केवळ धड्यातून शिकलं जातं ते परीक्षेसाठी उपयुक्त ठरतं; पण समाजात जे शिकलं जातं ते आयुष्यासाठी उपयुक्त होतं हे त्यांना समजलं. यवतमाळ डाएटमध्ये तीन वर्ष काम करत असताना या साऱ्या बाबी करायला मिळाल्या. यामधून मुलांच्या सामाजिकीकरणाला कशी गती मिळते हे प्रत्यक्ष अनुभवलं. त्याचा सहसंबंध शाळेत शिकवल्या जाणाऱ्या धड्यांशी लावला तर मुलाला अधिक चांगलं समजतं हेही लक्षात येतं. या उपक्रमात अनेक पालकांनी सहभाग घेतला. पालकांनी आपल्या मुलाच्या वर्तनात झालेला बदलसुद्धा सांगितला. चार भिंतींच्या आत राहून मुलाची सामाजिकीकरणाची प्रक्रिया होत नाही तर मुलाला समाजात जावं लागतं. समाजातील सुखदुःखांशी समरस व्हावं लागतं. तेव्हाच खऱ्या अर्थाने मुलाच्या सामाजिक जाणिवा समृद्ध व्हायला लागतात. हे प्राथमिक शाळेतच घडवले गेले पाहिजे. प्राथमिक शाळेत जर हे घडवलं तरच मुल भविष्यामध्ये तशा प्रकारची कृती करतं. आजकालच्या अभ्यासक्रमामध्ये केवळ अभ्यास म्हणून जर धडे गिरवले जात असतील तर ते योग्य नाही. मग आपण परीक्षार्थी विद्यार्थी बनवणार आहोत की, सामाजिक जाणीव असणारा विद्यार्थी बनवणार आहोत? हा प्रश्न आहे. म्हणून मुलाच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही आज काळाची गरज झाली आहे.
(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)