
स्वच्छ देवरूख अभियानाकडे एसटीचे दुर्लक्ष
स्वच्छ देवरूख अभियानाकडे एसटीचे दुर्लक्ष
बसस्थानकात अस्वच्छता ः अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
देवरूख, ता. ५ ः सुंदर देवरुख, स्वच्छ देवरूख अभियानात सर्व स्तरातील लोक सहभागी होत आहेत. मात्र येथील बसस्थानकात अस्वच्छतेबाबत एसटी महामंडळाकडुन दुर्लक्ष होत आहे.
देवरुख बसस्थानकावरील अपूर्ण कामे व अस्वच्छता यासंदर्भात आमदार शेखर निकम यांनी अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानुसार देवरुख आगार व बसस्थानकात समस्या सांगून त्वरीत बैठकीचे आदेश दिले. तरीही देवरुख बसस्थानक ठेकेदाराकडून आवश्यक सर्व कामे कराराप्रमाणे करुन घेतली जात नाहीत. त्याचा त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे. बसस्थानकात असुविधा, अस्वच्छता आहे. त्यात छप्पराचे काम अपूर्ण असुन पावसाळ्यात सर्व पाणी बसस्थानकात येते. बसस्थानकातील प्रसाधनगृहे अपूर्ण व आत्यंतिक अस्वच्छ आहेत. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगार व सिमेंट पडुन आहे. सध्या तेथे मोठ्या प्रमाणावर साप, उंदीर, घुशी आहेत. त्यामुळे प्रवाशांना साप वगैरे चावून जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता भंगार उचलून विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. देवरुख बाजार रस्ता व बसस्थानकातील जागा ठेकेदाराने साफ करून, समपातळी करुन, पेव्हर ब्लॉक्स लावून मोकळी करून दिलेली नाही. यासंदर्भात समितीचे निमंत्रक हेमंत तांबे यांनी अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार केली आहे. याचे पत्र मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
दरम्यान, सुंदर देवरुख, स्वच्छ देवरूख अभियानात सहभागी होत तालुका दंडाधिकारी व तहसीलदार सुहास थोरात यांनी देवरुखातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांची सभा घेऊन ताबडतोब सर्व कार्यालयातील प्रसाधनगृहे स्वच्छ करण्याचे आदेश देऊन काम करवून घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती संघमित्रा फुले यांनीही स्वतः देवरुखात येऊन ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सर्व समस्या दूर केल्या. रुग्णालय परिसरातील भंगार यांची त्वरित विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले.