सावरी केळेवाडीने साधला 10 वर्षांनी एकोपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरी केळेवाडीने साधला 10 वर्षांनी एकोपा
सावरी केळेवाडीने साधला 10 वर्षांनी एकोपा

सावरी केळेवाडीने साधला 10 वर्षांनी एकोपा

sakal_logo
By

सावरी केळेवाडीने साधला १० वर्षांनी एकोपा
मंडणगड पोलिसांचे मार्गदर्शन ; पाणी विषय ठरला महत्वाचा
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.५ ःतालुक्यातील सावरी केळेवाडी येथे पाणी समस्या विषयांवर घेण्यात आलेली संवाद सभा दुभंगलेल्या गावाचा एकोपा साधणारी ठरली. सुसंवाद साधत दहा वर्षांनी आपापसातील वैचारीक व राजकीय मतभेद विसरून गावकऱ्यांनी एकजुटीचा विचार अमलांत आणीत आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
गेली १० वर्षे सावरी केळेवाडी उदास, अशांत आणि उद्विग्न होती. वैचारिक व राजकीय मतभेद, नाराजी, वैयक्तिक भांडणे विकोपाला जाऊन गैरसमज वाढत जाऊन वाडी दोन गटांत विभागली गेली होती. यातच बोरिंगच्या पाण्याचा वाद उभा राहिला. बोअरिंगचे पाणी बंदच करण्यात आले होते, त्यामुळे गावात राहणाऱ्या स्त्रिया आणि वयोवृद्ध यांचे अतोनात हाल झाले, मुंबईकर गावी येणे कमी झाले. बोअरिंग चालू करण्यासाठी प्रयत्न झाले पण गावातील गटा-गटाच्या भांडणामूळे यशस्वी झाले नाहीत. यावर्षी पुन्हा पाण्याचा प्रश्न बिकट झाला, नळाचे नैसर्गिक स्त्रोतापासून येणारे पाणी जानेवारीतच नगण्य झाले. २४ फेब्रुवारी रोजी केळेवाडीत पाण्याच्या प्रश्नासाठी झालेली सभा मात्र हे चित्र पालटणारी ठरली.
मंडणगड पोलीस प्रशासनाच्या मध्यस्तीने, मंडणगडचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईकर ग्रामस्थ आणि स्थानिक ग्रामस्थ व महिला यांची एकत्रित सभा झाली. बोअरिंग सगळ्यांसाठी चालू करणे, सर्वांनी देखभाल खर्च उचलणे, विवादित विषय सामंजस्याने सोडवणे आणि मागचे सगळे हेवेदावे, वैमनस्य विसरून सगळ्यांनी वाडी म्हणून एकत्र येणे यावर सर्व संमती झाली.
या निर्णयांनी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या होळीच्या दिवशी शुभमुहूर्त झाला. दुभंगलेली सावरी केळेवाडी पुन्हा एक झाली. या सभेला पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम सावंत यांच्या उत्तम नेतृत्वाने यशस्वी केले. त्यासोबतच, पोलीस अधिकारी झगडे, ग्रामसेवक डी. एस कुवर, तलाठी पवार, पोलिस पाटील सावंत, सरपंच विनिता पाडावे यांचेही मार्गदर्शन लाभले. विशेष अतिथी अरुण घोसाळकर, त्याचप्रमाणे प्रताप घोसाळकर यांचेही सहकार्य आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. सभेने वाडीतील १० वर्षांची कटुता संपवण्याचे ऐतिहासिक यश मिळवले. सभेचा शेवट सर्वांना साखर वाटून तोंड गोड करून करण्यात आला.

चौकट
‘आता उठवू सारे रान’ पुरस्कार
गाव अधिक समृद्ध होऊन मानसिक आरोग्य आनंदी राहण्याच्या दृष्टीने गावातील वाद संपुष्टात आणीत वैचारिक एकी साधणाऱ्या गावांना ‘आता उठवू सारे रान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तालुक्यातील सावरी केळेवाडी या दुसऱ्या गावाला हा पुरस्कार ता.२ एप्रिल रोजी सन्मानाने प्रदान करण्यात येणार असल्याचे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक सुनील माळी यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.