होळीच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळीच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संकल्प
होळीच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संकल्प

होळीच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संकल्प

sakal_logo
By

87420
कसाल ः शाळा परिसरातील कचरा गोळा करून त्याची होळी खेळताना व शपथ घेताना विद्यानिकतेन हायस्कूलची मुले.
87421
होळीनिमित्त रतांबा झाडाचे पूजन करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेताना मुले.


होळीच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संकल्प

कसालमध्ये नवा पायंडा; विद्यार्थ्यांच्या होळीतील वेगळेपण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः होळी म्हटली की, आंब्याच्या झाडाची तोड करून ते झाड होळीच्या ठिकाणी उभे केले जाते. यासाठी मोठमोठी आंब्याची झाडे तोडली जातात; मात्र कसाल येथील विद्यानिकेतन स्कूलच्या मुलांनी वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. होळी साजरी करतानाच परिसरातील स्वच्छता व झाडांच्या संवर्धनास प्राधान्य दिले आहे. शाळा परिसरातील कचरा एकत्र करीत त्याला अग्नी देत आपल्या अंगातील दुर्गुणांची होळी करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. रतांबा झाडाची पूजा करीत झाड संवर्धनाचा निर्धार सुद्धा यावेळी मुलांनी केला.
होळी म्हटली की, प्रत्येक कोकणवासीयांच्या मनात वेगळा उत्साह निर्माण होतो. पाच ते सात दिवस चालणाऱ्या या सणात विविध आनंद लुटले जातात. यासाठी प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत; मात्र यात साम्य असते ते होळीच्या पहिल्या दिवशी परंपरागत सुरू असलेल्या होळीच्या ठिकाणी आंब्याचे झाड पुरणे. पूर्वी यासाठी होळी कोणाची मोठी, ही स्पर्धा असायची; मात्र आता आंब्याची उंच झाडे मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे ती स्पर्धा दिसत नाही. आंब्याचे झाड तोडून ते पुरले जाते. यामागे भावना, परंपरा आहे; मात्र नकळत यामुळे आपण निसर्गाचे समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरत आहोत. असमतोल वाढण्यास पुढाकार घेत असतो. होळी झाली की याबाबत एवढी झाडे तोडली गेली, अशी आकडेवारी अलीकडे सोशल मीडियावर वाचायला मिळते; मात्र, समतोल बिघडू नये यासाठी प्रयत्न अथवा पर्याय शोधताना कोण दिसत नाही.
कसाल येथील विद्यानिकेतन हायस्कूलच्या मुलांनी यावर्षी साजरी केलेली होळी आदर्शवत ठरली आहे. समाजभान राखताना होळीची परंपरा राखली गेली आहे. समाजाला जागृत करून बदलत्या परिस्थितीनुसार अशाप्रकारे होळी साजरी केली पाहिजे, यातून समाज आणि निसर्ग हितही जपले जाईल, याचे उदाहरण देण्यात आले आहे. मुलांनी आपल्या शाळा परिसरातील कचरा गोळा करून त्याची होळी केली. यामुळे परिसरातील कचरा गोळा होऊन परिसर स्वच्छ झाला. तसेच होळी खेळण्याचाही आनंद लुटता आला.
---
वृक्ष संवर्धनाची घेतली शपथ
होळी साजरी करताना झाडे तोडणार नाही, तोडताना कोण दिसल्यास आपल्या परीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन, वणवा पेटलेला दिसल्यास तो विझविण्याचा प्रयत्न करेन. तसेच आपल्या अंगातील दुर्गुण या होळीत नष्ट करीत आहे, अशी शपथ सुद्धा या मुलांनी घेतली. तेथे असलेल्या रतांबा झाडाचे पूजन केले. यातून वृक्ष संवर्धन करण्याची शपथही घेण्यात आली. मुलांच्या या आगळ्यावेगळ्या होळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.