
देवगडच्या किनाऱ्यावर वातावरणामध्ये बदल
देवगडच्या किनाऱ्यावर
वातावरणामध्ये बदल
देवगड, ता. ७ ः होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या किनारी भागातील वातावरणात बदल जाणवत आहे. आज पहाटेपासून किनारी भागात जोराचा वारा सुटला होता. काल (ता. ६) सायंकाळपासून वातावरणात धुलीकण असल्याचे जाणवत होते. त्यातच रात्रीच्या सुमारास काही भागात पावसाचे थेंब टपकले.
गेले काही दिवस वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत. दिवसा कडक ऊन तर पहाटेच्यावेळी थंडी, असे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल सायंकाळच्या सुमारास वातावरणात धुलीकण असल्याचे जाणवत होते. त्यामुळे धुळीचे वादळ उठल्यासारखे वातावरण भासत होते. रात्री आकाशात काळे ढग दाटून येऊन पावसाचे थेंब टपकले. आज पहाटेपासून दुपारपर्यंत किनारी भागात जोराचा वारा सुटला होता. वार्यामुळे धुळ वातावरणात मिसळत होती. वातावरणातील उकाडाही वाढला होता. त्यामुळे पाऊस कोसळण्याची लक्षणे मानली जात होती. जोराचा वारा सुटल्याने आंबा फळे जमिनदोस्त होण्याच्या भीतीने बागायतदारांमधील चिंता वाढली होती. वारा थांबल्यानंतर पुन्हा उकाडा जाणवू लागला होता.