करवाढीप्रश्नी विश्वासात घेतले नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवाढीप्रश्नी विश्वासात घेतले नाही
करवाढीप्रश्नी विश्वासात घेतले नाही

करवाढीप्रश्नी विश्वासात घेतले नाही

sakal_logo
By

87504
दीपक केसरकर


सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांची
भूमिका तपासणार ः केसरकर
सावंतवाडी, ता. ७ ः शहरातील पाणीपट्टी व घरपट्टी करवाढ करताना मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला विश्वासात घेतले पाहिजे होते. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून एकमेव असताना मुख्याधिकाऱ्यांनी कोणत्या उद्देशाने हा निर्णय घेतला, हे तपासले जाईल. त्यांची भूमिका संशयास्पद असल्यास त्यांच्या जागी नवीन अधिकारी आणला जाईल, अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे मांडली.
करवाढीस प्रशासनाने स्थगिती दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मोती तलाव शहराचे वैभव आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा ठरेल, असे कुठलेही कृत्य सहन केले जाणार नाही. त्यामुळे आठवडा बाजार अन्यत्र हलविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री केसरकर यांनी आज येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘‘नगरपालिकेने केलेल्या करवाढीबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. मुख्याधिकाऱ्यांनी मला याची कल्पना सुद्धा दिली नव्हती. ही करवाढ वाजवी आहे की कसे, याबाबत मी खात्री करणार आहे. दोन कोटींमध्ये नागरिकांना २४ तास पाणी देण्याबाबत विचारणा सुरू आहे. सावंतवाडी शहराच्या सुधारीत नवीन योजनेला ५७ कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठी २ कोटी ८७ लाख रुपये लोकवर्गणी भरावी लागत असेल, तर तो जनतेच्या माथ्यावर कर बसणार आहे. त्यामुळे २ कोटीची नळयोजना आणण्यात येईल. शहरात स्पोर्ट कॉम्प्लेक्स ड्रेसिंग रुम नवीन मार्केट उभारण्यात येणार आहे. नवीन मार्केट उभारताना सध्याच्या व्यापाऱ्यांना हलविण्यात येणार आहे. त्यांची तात्पुरती व्यवस्था वीस लाख रुपये खर्च करून करण्यात येईल. जिमखाना मैदानावरील ड्रेसिंग रुमही अद्यावत करण्यात येईल.’’
ते म्हणाले, ‘‘कामाच्या व्यापामुळे शहरावर काहीसे दुर्लक्ष झाले आहे; मात्र यापुढे आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यात येणार आहे. सावंतवाडीतील करवाढ करताना अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा करणे गरजेचे होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी वाढीव कर रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली व जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर स्थगिती आणण्याची विनंती केली. त्यामुळे करवाढीस स्थगिती मिळाली असली, तरी येथील एकमेव लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी मला न सांगता घेतलेला हा निर्णय संशयास्पद वाटल्यास त्यांच्या जागी नवीन अधिकारी आणला जाईल. ते चांगले काम करतात म्हणून त्यांना या ठिकाणी आणले होते; परंतु त्यांच्याकडून चुकीचे कामे होत असल्यास गप्प बसणार नाही. मोती तलाव हे शहराचे वैभव आहे. मी नगराध्यक्ष असताना येथील सर्व अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे आठवडा बाजार दुसरीकडे हलवण्यावर मी ठाम आहे; मात्र येथील नागरिकांवर आणि स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.’’
...............
चौकट
ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो
शिवसेनेइतकेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला ‘टार्गेट’ करून कोणाचाही फायदा होणार नाही. या ठिकाणी कोण काय बोलले, याने मला फरक पडत नाही. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, असा टोला मंत्री केसरकर यांनी लगावला. सत्तेत असतानाही भाजपाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टिकेबद्दल केलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.